भय इथले संपत नाही!

भय इथले संपत नाही!

पुणे, ता. १४ ः शहरात महापालिकेने दोन हजार ४०० पेक्षा जास्त होर्डिंगला मान्यता दिली आहे. एकही अनधिकृत होर्डिंग शहरात नाही, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. रस्त्याच्या कडेला, इमारतींवर महाकाय होर्डिंग उभी आहेत. त्यात राज्य सरकारने केलेल्या नियमावलीचे उल्लंघन केले तरी कारवाई होत नाही. होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट संबंधित व्यावसायिक करतो, पण त्याची उलटतापसणी करण्याची यंत्रणाच महापालिकेकडे नसल्याने केवळ कागदोपत्री घोडे नाचविले जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका आहे.

गेल्या महिन्यात नगर रस्त्यावर वाघोली येथे वादळी पावसात भले मोठे होर्डिंग कोसळले. सुदैवाने त्यात कोणालाही इजा झाली नाही. त्यानंतर सोमवारी (ता. १३) मुंबई येथे आलेल्या वादळात होर्डिंग पडून १४ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा होर्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
व्यावसायिक, कंपन्या, शैक्षणिक संस्था, क्लासचालक, राजकीय पुढारी यांचे कार्यक्रम व इतर उपक्रमाच्या जाहिरातींसाठी चौकांमधील, रस्त्यावर होर्डिंगला प्राधान्य देतात. यातून होर्डिंग व्यावसायिकाला महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. असे होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी आवश्‍यक असते.

शुल्क व कारवाईचे गणित
- महापालिका २०१३-१४ पासून आत्तापर्यंत प्रतिवर्ष प्रतिचौरस फुटाला २२२ रुपये शुल्क आकारत होती
- यामध्ये वाढ करून प्रतिवर्ष प्रतिचौरस फुटांसाठी ५८० रुपये शुल्क निश्‍चित केले
- सर्वेक्षणात शहरात एक हजार ९६५ बेकायदा होर्डिंग आढळून आली
- सर्वाधिक होर्डिंग नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत
- बेकायदा होर्डिंग उभारणाऱ्यांनी अर्ज करून होर्डिंग अधिकृत करून घ्यावे, अन्यथा महापालिका कारवाई करेल असा इशारा दिला होता
- गेल्या वर्षभरात महापालिकेने दीड हजारपेक्षा जास्त अनधिकृत होर्डिंग काढून टाकली
- जे होर्डिंग अधिकृत करणे शक्य होते, त्यांच्याकडून पैसे भरून घेऊन त्यांना परवाना दिला

अशी आहे स्थिती
- महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दोन हजार ४४३ होर्डिंग
- सर्वाधिक ४५२ होर्डिंग शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत
- सर्वांत कमी २६ होर्डिंग भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत
- अनेक होर्डिंग जुन्या इमारतींच्या गच्चीवर, गॅलरी, बाजूच्या भिंतीवर लावली आहेत
- काही ठिकणी मोकळ्या जागा, इमारतीचे फ्रंट व साइड मार्जिनमध्ये आहेत
- राज्य सरकारने २०२२ मध्ये आकाशचिन्ह विभागासाठी नवी नियमावली तयार केली
- त्याचे पालन करून होर्डिंगला परवानगी देणे आवश्यक
- पण त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने धोका

उलटतपासणीच नाही
पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून नवीन होर्डिंगला परवानगी देताना किंवा जुन्या परवान्याचे नूतनीकरण करताना होर्डिंग व्यावसायिकांकडून सुरक्षेच्या दृष्‍टीने मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून इमारतीची क्षमता, दोन अडीच टनाचा मोठा लोखंडी सांगाडा सुरक्षित असल्याचा अहवाल दिला जातो. पण महापालिकेने आतापर्यंत एकदाही होर्डिंग, संबंधित इमारत खरेच मजबूत आहे का? याची उलटतपासणी केलेली नाही. वाघोली येथे होर्डिंग पडल्यानंतर शहरातील सर्व होर्डिंगची तपासणी केली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, त्यावर पुढे काहीच झाले नाही.

जुन्या इमारतींवर ओझे
- शहराच्या नव्या, जुन्या हद्दीमध्ये नव्याने होर्डिंग उभारली जात आहेत
- मध्यवर्ती पेठा, शिवाजीनगर, डेक्कन, स्वारगेट, शंकरशेठ रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, कोथरूड, पुणे स्टेशन परिसर,
बंडगार्डन, कात्रज यांसह शहरातील इतर महत्त्वाच्या रस्त्यांवरील जुन्या इमारतींवर मोठमोठी होर्डिंग उभे आहेत
- इमारतीच्या गच्चीवर दोन-तीनपेक्षा जास्त होर्डिंगचे सांगडे उभारलेले आहेत
- खिडक्या, गॅलरी बंद करून इमारतीमध्ये येणारा प्रकाश व हवेचा मार्ग बंद करून होर्डिंग लावले आहेत
- इमारत जुनी होत असताना हजारो किलोचे लोखंडाचे सांगडे उभे केले जात असल्याने इमारतीच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता
- महापालिकेकडून अशा ठिकाणी कोणतीही तपासणी केली जात नाही
- मोकळ्या जागेत होर्डिंग उभारताना त्याचा पाया भक्कम आहे का? याची तपासणी केली जात नाही

शहरातील सर्व होर्डिंगचे ऑडिट करण्याचा आदेश आकाशचिन्ह विभागाला दिला आहे. शहरात २४४३ अधिकृत होर्डिंग आहेत. त्यातील १५६४ वर कारवाई करण्यात आली आहे. जर अनधिकृत होर्डिंग उभारले तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
- राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका

क्षेत्रीय कार्यालय आणि होर्डिंगची संख्या
औंध- ३४९
भवानी - २६
बिबवेवाडी - १११
धनकवडी - ६९
ढोले पाटील - १५४
हडपसर-मुंढवा - १६७
कोंढवा येवलेवाडी - १०९
कोथरूड - ९१
नगर रस्ता - ३४६
शिवाजीनगर - ४५२
टिळक रस्ता - १३७
कसबा विश्रामबाग - १५७
वारजे-कर्वेनगर -१०४
येरवडा -१११
वानवडी - ६३
..............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com