कोथरूड, वडगावशेरी ठरविणार पुण्याचा खासदार

कोथरूड, वडगावशेरी ठरविणार पुण्याचा खासदार

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १४ : पुणे शहर लोकसभा निवडणुकीत सार्वधिक मतदान झालेल्या कोथरूड आणि वडगाव शेरी हे दोन मतदार संघ विजयावर अंतिम मोहोर उमटविणार आहे. त्यांनी कोणच्या बाजूने कौल दिला आहे, त्यावर पुण्याचा नवा खासदार ठरणार असल्याचे मतदानाच्या अंतिम आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
शहरातील लोकसभा मतदार संघातील मतदानाची अंतिम टक्केवारी मंगळवारी निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध केली. त्यानुसार पुणे शहरात ५३.५४ टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये ४९.८४ टक्के मतदान झाले होते. गेल्यावेळेपेक्षा ३.७ टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे. २०१९ मध्ये १० लाख ३५ हजार २३६ मतदारांनी मतदान केले होते. या वेळेस ११ लाख ०३ हजार ६७८ मतदारांनी मतदान केले. यंदा ६८ हजार ४४२ ने मतदान वाढले आहे. हा वाढलेला टक्का कोणाला फायदाचा ठरणार, यावर विजयाची गणिते ठरणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी पहिल्याच टप्प्यात जाहीर केली. त्यामुळे मोहोळ यांना प्रचारासाठी सुमारे दीड महिन्यांहून अधिक कालावधी मिळाला. तर, धंगेकर यांची उमेदवारी पक्षातंर्गत स्पर्धेमुळे काँग्रेसने शेवटी जाहीर केली. भाजपला गेल्या दोन निवडणुकांत या मतदारसंघातून तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या झालेल्या जाहीर सभा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची देखरेख, नेटकी प्रचार यंत्रणा यामुळे भाजपला पुण्यातील निवडणूक सोपी वाटत होती. प्रत्यक्षात मतदानापूर्वी शेवटच्या टप्प्यात धंगेकर यांनी चांगले आव्हान निर्माण केले. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, आम आदमी पार्टी आणि समाजावादी संघटनांची चांगली रसद मिळाली. त्यातच काँग्रेस हायकमांडने विदर्भातील आठ आमदार पुण्यात पाठविले. ते रोज अहवाल हायकमांडला देत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील पुण्यावर लक्ष ठेवून होते. शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडी एकसंध झाल्याचे प्रतिबिंब मतदानात उमटले.
वडगाव शेरीमध्ये सर्वाधिक म्हणजे चार लाख ६७ हजार ६६९ मतदार होते. लोकसभेच्या निकालात या मतदारसंघातील मताधिक्य निर्णायक ठरणार असल्याने त्यावर भाजप आणि महाविकास आघाडीने लक्ष केंद्रित केले होते. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आमदार आहेत. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत असल्यामुळे टिंगरे यांनी लोकसभेसाठीचे इच्छुक जगदीश मुळीक यांनी येथे प्रचाराचा भार उचलला. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे तत्कालीन उमेदवार गिरीश बापट यांना ५६ हजार ७५७ मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे भाजपला मताधिक्याची खात्री आहे तर, येथे काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा असल्याने धंगेकर यांना मताधिक्याची खात्री आहे.
कोथरूडमध्येही मतदारसंख्या चार लाख १४ हजार ७५५ असून दोन लाख १७ हजार ४५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. हा मतदारसंख्या भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे येथे सर्वाधिक मताधिक्य मिळाले तर, विजय शक्य आहे, असे भाजपचे गृहितक आहे. त्यासाठीच धंगेकर यांनी येथून चांगली मतदान व्हावे, यासाठी आटोकाट प्रयत्न केले. या मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची चांगली मतपेढी आहे. तसेच काही ठिकाणी काँग्रेसचेही ‘पॉकेट’ आहेत. त्यावर धंगेकर यांची भिस्त आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघही भाजपला गड समजला जातो. लोकसभेच्या मागील निवडणुकीत या मतदारसंघाने भाजपला ६७ हजार मताधिक्य दिले होते. परंतु, आता परिस्थितीत बदल झाला आहे. येथे काँग्रेसचाही मतदार आहे. त्यामुळे झालेल्या एक लाख ८९ हजार १८४ मतदानातील मोठा वाटा भाजपकडे जाण्याची शक्यता असली तरी धंगेकर यांना येथे लक्षणीय मते मिळू शकतात. कोथरूड आणि पर्वतीमध्ये मिळणारे मताधिक्य विजयासाठी पुरेसे ठरेल, असे भाजपच्या वर्तुळात सांगितले जाते. कॅंटोन्मेंट हा कायमच काँग्रेसला अनुकूल मतदारसंघ असला तरी, सलग दोन निवडणुकांत येथे विजय मिळविण्याची किमया भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी साधली आहे. या मतदारसंघात मुस्लीम, ख्रिश्चन आणि दलित मतदार मोठ्या संख्येने आहेत. एकगठ्ठा मतदान, महाविकास आघाडीच्या
बाजूने राज्यात असलेली लाट यामुळे कॅंटोन्मेंटमध्ये मताधिक्याची काँग्रेसला अपेक्षा आहे.
शहराचा एकूण विचार केला तर, कोथरूड, पर्वतीमधील मताधिक्यावर भाजपची मदार आहे तर, वडगाव शेरी, कॅंटोन्मेंट, शिवाजीनगर आणि कसब्यावर महाविकास आघाडीची भिस्त आहे. त्यातच ६८ हजार मतदान वाढले आहे. त्याचा टक्का कोणाच्या पारड्यात पडणार, यावर पुण्याचा निकाल अवलंबून असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com