वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात?

वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात?

पुणे, ता. १४ : पुणे लोकसभा मतदारसंघात ५३.५४ टक्के, शिरूर लोकसभा मतदारसंघात ५४.१६ टक्के तर मावळ लोकसभा मतदारसंघात ५४.५७ टक्के मतदान झाले आहे. २०१९ च्या तुलनेत पुण्यात मतदानात ३.४० टक्क्यांनी वाढ झाली असली तर शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात मात्र मतदानाचा टक्का घसरला आहे. या तिन्ही मतदारसंघांत मतदान करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीविरुद्ध महायुतीच्या रणसंग्रमात कोण बाजी मारणार?, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. पुणे लोकसभा मतदारसंघात प्रमुख दोन पक्षांसह ३५ उमेदवार रिंगणात होते. परंतु महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी दुरंगी लढत झाली. ६० टक्क्यांपर्यंत मतदान होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र ५३.५४ टक्के मतदान झाले. मतदानाची अंतिम आकडेवारी आल्यानंतर राजकीय नेत्यांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.

शिरूरमध्ये ग्रामीण भागात टक्केवारीत वाढ
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांच्या गटात लढत असलेल्या शिरूर मतदारसंघात यंदा मतदानाचा टक्का घसरला आहे. यंदा ५४.१६ टक्के मतदान झाले आहे. गतवेळेपेक्षा सुमारे ६.५० टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे. टक्का घसरला असला, तरी मतदान करणाऱ्यांच्या संख्येत ८५ हजारांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वाढलेले मतदान कोणाला पोषक ठरणार?, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये लढत होती. या मतदारसंघातील हडपसर हा पुणे शहराशी, तर भोसरी हा पिंपरी-चिंचवड शहराशी लगत असलेला शहरी भाग आहे. या भागात मतदानाचा टक्का घसरला आहे. याउलट, ग्रामीण भागातील चारही मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे तुतारी वाजणार की धनुष्यबाण चालणार? यावरून राजकीय वर्तुळात चर्चेचे फड रंगू लागले आहेत.

चिंचवड ठरविणार मावळचा विजय
शिवसेनेच्या दोन्ही गटात लढत असलेल्या मावळ मतदारसंघात २०१९च्या तुलनेत ४.५८ टक्क्यांनी मतदान घसरून यंदा ५४.८७ टक्के मतदान झाले आहे. मात्र येथेही मतदारांची संख्या सुमारे ५२ हजारांनी वाढली आहे. उद्धव ठाकरेविरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी थेट लढत असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे. वाढलेल्या मतदानाचा फायदा घेत शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार श्रीरंग बारणे हॅटट्रिक करणार की शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार संजोग वाघेरे त्यांना रोखणार?, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
या मतदार संघातील तीन विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात तर तीन रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आहेत. या लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघ येतो. याच मतदारसंघातील दोन्ही उमेदवार आहेत. त्यामुळे याच मतदार संघावर विजयाची गणिते ठरणार आहेत.

मतदान टक्केवारी
लोकसभा मतदारसंघ २०२४ २०१९
- पुणे- ५३.५४ ४९.८४
- शिरूर- ५४.१६ ६०.६२
- मावळ- ५४.८७ ५९.४५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com