थकबाकीने पथारीवाल्यांना आणले रस्त्यावर!

थकबाकीने पथारीवाल्यांना आणले रस्त्यावर!

ब्रिजमोहन पाटील ः सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. १५ ः पथारी व्यावसायिकांसाठी नव्याने बायोमॅट्रीक सर्वेक्षण करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू असताना दुसरीकडे थकबाकीदारांची संख्याही मोठी आहे. १२ हजार १०० व्यावसायिकांकडून तब्बल ५८ कोटी ६० लाख ६१ हजार ३० रुपयांचे येणे आहे. मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालत असल्याने त्यांचे उत्पन्नही जास्त आहे. तरी त्यांची थकबाकी सर्वाधिक १५ कोटी ८१ लाख रुपये इतकी आहे. मात्र, महापालिकेने दर महिन्याला बिल देण्याऐवजी एकदम दोन-तीन वर्षांचे बिल दिल्याने कंबरडे मोडले आहे, असा आरोप व्यावसायिकांनी केला आहे.

महापालिकेने २०१४मध्ये फेरीवाला धोरणानुसार बायोमॅट्रीक सर्वेक्षण करून अ, ब, क, ड, इ श्रेणीनुसार परवाना दिला आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात २३ हजार १६६ जणांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी १२ हजार १०० जणांचे शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील ५२५ झोनमध्ये पुनर्वसन करण्यात आले. ज्या भागात सर्वाधिक व्यवसाय होतो तेथे अ, ब, कर्जाचे परवाने दिले आहेत. तर जेथे व्यवसाय कमी आहे, त्यांनी नुकताच व्यवसाय सुरू केला आहे. त्यांना ड, इ असे परवाने दिले आहेत. ड, इ मधील बहुतांश जणांचे पुनर्वसन रखडले आहे, त्यामुळे त्यांचे परवानेही रद्द केले आहेत.

पुन्हा करणार सर्वेक्षण
पुन्हा पथारी सर्वेक्षण करून परवाने नूतनीकरण आणि नव्याने परवाने दिले जाणार आहेत. त्यासाठी नगर पथ विक्रेता समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. पण हे सर्वेक्षण सुरू करण्यापूर्वी ज्यांचे नूतनीकरण करायचे आहे त्यांनी मार्च २०२४ पर्यंतची थकबाकी भरणे अनिवार्य आहे. त्याशिवाय त्यांचे नूतनीकरण केले जाणार नाही असाही निर्णय या समितीने घेतला आहे.

कसबा-विश्रामबाग सर्वाधिक थकबाकी
अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे मिळालेल्या माहितीनुसार एकूण थकबाकी ५८ कोटी ६० लाख रुपयांची आहे. त्यामध्ये कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील दोन हजार १०२ व्यावसायिकांची सर्वाधिक थकबाकी १५ कोटी ८१ लाख रुपये इतकी आहे. या भागात मंडई, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, रविवार पेठ, कसबा पेठ हा प्रमुख बाजारपेठेचा भाग आहे. संपूर्ण शहरातून ग्राहक या भागात खरेदीसाठी येतात. त्यामुळे येथील कपडे, खाद्यपदार्थ, घरगुती वस्तू विक्रेते आदी व्यवसायिकांची उलाढाल शहराच्या इतर भागापेक्षा जास्त आहे. तरीही या भागातील थकबाकी जास्त असल्याचे समोर आले आहे.

थकबाकीचे कारण
- २०१८ पूर्वी पथारीचे भाडे प्रतिमहिना ६० रुपये ते १२० रुपये होते
- २०१८ पासून प्रतिदिन २०० रुपये इतके भाडे केले
- त्यामुळे व्यावसायिकांना प्रतिमहिना सहा हजार रुपये भाडे आले
- व्यावसायिकांनी तक्रारी केल्यानंतर प्रतिदिन १०० रुपये याप्रमाणे तीन हजार रुपये भाडे निश्‍चित केले
- पण त्याचे बिल प्रत्येक महिन्याला न पाठवता एकदम पाच-सहा वर्षांचे बिल पाठवले
- त्यामुळे थकबाकी जास्त दिसत आहे
- प्रत्येक व्यावसायिकाला एक लाख ते साडेतीन लाखापर्यंत बिल आल्याने तारांबळ


महापालिकेने मला ७८ महिन्यांचे सव्वादोन लाख रुपयांचे बिल पाठवले आहे. ही रक्कम एकदम भरण्यास सांगितली जात आहे. एवढी मोठी रक्कम कोठून आणणार? महापालिकेने भाड्यात प्रचंड वाढ केली आहेच, पण प्रत्येक महिन्याला बिल न पाठवता पाच-सहा वर्षांचे बिल एकदम पाठवले आहे. ही रक्कम भरण्यासाठी हप्ते पाडून देणे आवश्‍यक आहे. अनधिकृत पथारी व्यावसायिकांना अभय देऊन हप्तेवसुली सुरू आहे. त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

- नरेंद्र हंबीर, पथारी व्यावसायिक

पथारी व्यावसायिकांचे परवाने नूतनीकरण करण्यासाठी त्यांना थकबाकी भरावी लागले. ज्यांना त्यांच्या थकबाकीबद्दल आक्षेप आहेत त्यांनी आमच्याकडे अर्ज करावा. त्यावर सुनावणी घेऊन तोडगा काढला जाईल. ज्या व्यावसायिकांनी त्यांचे परवाने भाड्याने देऊन दरमहा २५ हजारापर्यंत भाडे घेत आहेत. त्यांच्यावरही कारवाई केली जात आहे.
- माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग

क्षेत्रीय कार्यालय -परवाना संख्या - थकबाकी (कोटींमध्ये)
नगर रस्ता - ४०७ - २.३४
येरवडा कळस - १२३२ - ३.९४
ढोले पाटील - १०१५ - २.५३
औंध बाणेर - ५२८ - १.५८
घोले रस्ता - १०७९ - ५. २८
कोथरूड बावधन - ५३० - १.६
धनकवडी - ७०१ - ४.४१
सिंहगड रस्ता - ७६३ - ५.२
वारजे कर्वेनगर - ७६६ - १.६८
हडपसर मुंढवा - ७६७ - २.६७
वानवडी रामटेकडी - २६१ - ८९.८०
कोंढवा येवलेवाडी - २३३ -१. ३६
कसबा विश्रामबाग - २१०२ - १५.८१
भवानी पेठ - ८५९ - ४.९३
बिबवेवाडी - ८५७ - ५.३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com