होर्डिंगचा भार सोसण्यासाठी फाइलवर ‘वजन’

होर्डिंगचा भार सोसण्यासाठी फाइलवर ‘वजन’

पुणे, ता. १६ ः शहरात मोक्याच्या ठिकाणी होर्डिंग लावण्यासाठी योग्य जागा नसताना फाइलवर ‘वजन’ ठेवताच नियमात न बसणारा प्रस्तावही मंजूर केला जातो. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या एजंटांसोबतच्या ‘अर्थ’पूर्ण संबंधामुळे होर्डिंगचा सुळसुळाट झाला आहे. होर्डिंगवर कारवाई होऊ नये यासाठीही आता ओळखी काढून दबाव आणण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, महापालिका आयुक्तांनी कारवाई करण्याचा आदेश दिल्याने कर्मचारी, एजंटांचे धाबे दणाणले आहेत. आता काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग पडून त्यात १४ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरांमध्ये चौकाचौकांत, रस्त्यावर उभारलेल्या होर्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पुणे शहरात दोन हजार ५९८ अधिकृत होर्डिंग आहेत, तर ८५ अनधिकृत होर्डिंग असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी होर्डिंगच्या संदर्भात बैठक घेऊन कारवाईचा आदेश दिला आहे. राज्य सरकारने २०२२ मध्ये नवीन नियमावली तयार केली आहे. त्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने होर्डिंग कसे उभारावे, कोणत्या गोष्टी करू नयेत याची स्पष्ट तरतूद केलेली आहे. तरीही महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागातील अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त, परिमंडळाच्या उपायुक्तांकडून या नियमावलीकडे दुर्लक्ष करून परवानगी दिली जात आहे.

होर्डिंगसाठी मोजावे लागतात लाखो रुपये
महापालिकेच्या हद्दीमध्ये नवीन होर्डिंग उभारताना आकाशचिन्ह विभागाचे कर्मचारी जागा पाहणी करून त्यास परवानगी देतात. मात्र, ही केवळ औपचारिकता आहे. प्रस्ताव दिल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयावरील परवाना निरीक्षक, सहाय्यक आयुक्त, उद्यान विभाग, परिमंडळ उपायुक्त कार्यालय, वाहतूक शाखा येथे प्रत्येक टेबलावर व्यावसायिकाला पैसे द्यावे लागतात. प्रत्येक होर्डिंगमागे एक लाखापेक्षा जास्त रक्कम वाटप करावी लागत असल्याने नियमात न बसणाऱ्या होर्डिंगला परवानाच पण प्रशासनाकडून अभयदेखील मिळते.

या नियमांकडे केले जाते दुर्लक्ष
होर्डिंग उभारण्यासाठी सरकारची नियमावली आहे. त्यामध्ये होर्डिंग रस्त्यात उभे करू नये, होर्डिंगचे खांब खासगी जागेत असले तरी त्याचा सांगडा जागेच्या बाहेर येऊ नये, होर्डिंगमुळे वाहनचालकांना त्रास होऊ नये, परिसरातील रहिवाशांना लाइटचा त्रास होऊ नये, इमारतीमध्ये प्रकाश, हवा येण्यात अडथळा होईल असे गॅलरी, खिडक्या बंद होतील अशा ठिकाणी होर्डिंग लावू नयेत असे नियम आहेत. साइड मार्जिनमध्ये होर्डिंग उभारताना पार्किंग, येण्या-जाण्याचा रस्ता बंद होऊ नये असे नियम आहेत. पण त्याकडे सर्रास दुर्लक्ष करून या त्रुटी नियमात बसवून परवानगी दिली जाते. त्यासाठी आर्थिक देवाणघेवाण होते. पण वजनदार व्यक्तीच्या ओळखीतून एखाद्याने प्रस्ताव दाखल केल्यास त्याचे काम पैसे न घेताही करून दिले जाते.

नोटिसा बजावूनही फरक पडेना
अनधिकृत होर्डिंगवर कारवाई न करणे, चुकीच्या पद्धतीने होर्डिंग उभारण्यास मान्यता देणे, त्यावर आदेश देऊनही कारवाई न करणे या कारणांनी परवाना निरीक्षक, सहाय्यक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली, काही कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले होते. तरीही क्षेत्रीय कार्यालयावरील यंत्रणा हलत नाही अशी अवस्था आहे.

सात दिवसांची मुदत
घाटकोपर दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त भोसले यांनी कडक भाषेत कारवाई करण्याचे बजावले आहे. जुन्या इमारतींसह अन्य ठिकाणी धोकादायक ठिकाणचे होर्डिंग सात दिवसांत काढून टाका असे आदेश दिले. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी नियमबाह्य होर्डिंगवर कारवाई करतात की पुन्हा वेळकाढूपणा करणार, याकडे लक्ष लागले आहे.

महापालिका आयुक्तांनी डेक्कन, जंगली महाराज रस्त्यावर होर्डिंगची पाहणी केली. आयुक्तांच्या आदेशानुसार नियमबाह्य होर्डिंग काढण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. पुढील दोन दिवसांत हे काम झाल्यानंतर सोमवारपासून कारवाई सुरू केली जाणार आहे.
- रवी खंडारे, सहाय्यक आयुक्त, शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय

होर्डिंग व्यवसायात अनेक चुकीचे लोक घुसले आहेत. त्यामुळे प्रशासनाला हाताशी धरून नियमबाह्यपणे होर्डिंग उभी केली जात आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यावसायिकांचेही यामध्ये नुकसान होत आहे.
- होर्डिंग व्यावसायिक

परवानगी असलेले वा नसलेले होर्डिंग असा घोळ घालत बसू नये. शहर होर्डिंगमुक्त करून टाकावे. डिजिटल युगामध्ये होर्डिंगची काहीच गरज नाही. समजा होर्डिंग काढून टाकले तर नागरिकांची काय गैरसोय होणार आहे? महापालिकेकडे होर्डिंगच्या तपासण्याची यंत्रणाच नाही तर स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीचे रिपोर्ट पैसे देऊनही मिळतील.
- संजय ढमढेरे, नागरिक, हडपसर

अनधिकृत होर्डिंगवर केलेली कारवाई
नगर रस्ता - ५१८
येरवडा कळस - ५१
ढोले पाटील - २८
औंध बाणेर - १२५
घोले रस्ता - १४
कोथरूड बावधन - ९८
धनकवडी - ११
सिंहगड रस्ता - ३२
वारजे कर्वेनगर - २७
हडपसर मुंढवा - ३५०
वानवडी रामटेकडी - ५८
कोंढवा येवलेवाडी - २४३
कसबा विश्रामबाग - ०
भवानी पेठ - ७
बिबवेवाडी - २

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com