मराठीतून ग्रंथनिर्मितीसाठी विद्यापीठ प्रयत्नशील

मराठीतून ग्रंथनिर्मितीसाठी विद्यापीठ प्रयत्नशील

पुणे, ता. १६ ः ‘‘मराठीतून उत्तम ग्रंथनिर्मिती होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रयत्नशील राहील. या दिशेने इतिहास विभागाने विद्यापीठ मुद्रणालयाच्या सहकार्याने निर्माण केलेले ग्रंथ महत्त्वपूर्ण आहेत,’’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांनी केले. प्रा. दीपक गायकवाड यांनी लिहिलेल्या ‘अमेरिकेतील नागरी अधिकारांची चळवळ’ आणि अवधूत डोंगरे यांनी मराठीत भाषांतर केलेल्या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात बोलत ते होते.
या वेळी राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक प्रा. शैलेंद्र देवळाणकर, इतिहास विभागप्रमुख प्रा. श्रद्धा कुंभोजकर आदी उपस्थित होते.
प्रा. गोसावी म्हणाले, ‘‘अनेक समकालीन संदर्भ देऊन आणि वर्णभेद समस्येविषयी करुणाभाव ठेऊन हे पुस्तक लिहिले आहे. आजही पाश्चात्त्य जगात वर्णभेदाची समस्या का आहे, हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक म्हणजे उत्तम संदर्भसाधन आहे. विशेष म्हणजे अनुवादित पुस्तक असूनही याची भाषा पाहून मला असे जाणवले की, हे भाषांतर करताना त्यात विषयाचा नीट विचार करून भाषा वापरली आहे.’’ देवळाणकर म्हणाले, पाश्चात्त्य देश मानवी अधिकारांबाबत बरंच बोलत असले, तरी त्यांच्या इतिहासातही वर्णभेदासारख्या समस्यांचे अजूनही सावट आहे. ते उघडकीला आणून पाश्चात्त्य प्रभुत्वाचे जोखड भिरकावण्यासाठी प्रा. गायकवाड यांच्या पुस्तकाचा सामान्य वाचकाला निश्चित उपयोग होईल.’’ प्रा. बाबासाहेब दुधभाते यांनी आभार व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com