Balbharati-Paud Phata Road
Balbharati-Paud Phata RoadSakal

Balbharati-Paud Phata Road : बालभारती-पौड फाटा रस्त्यावरून ट्विटर वॉर

पुणे महापालिकेने विधी महाविद्यालयाला पर्यायी मार्ग म्हणून वेताळ टेकडीवरून बालभारती ते पौड फाटा असा रस्ता प्रस्तावित केला आहे. हा रस्ता करताना टेकडी फोडावी लागणार आहे.

पुणे : वेताळ टेकडीवरून प्रस्तावित असलेल्या बालभारती पौड फाटा रस्त्याला पर्यावरणप्रेमी नागरिकांचा विरोध असून, लोकसभा निवडणुकीतही हा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र मतदान झाल्यानंतर भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना टार्गेट करत ‘‘यांनी तर काँग्रेसलाच मतदान केले आहे.

त्यामुळे आता डंके की चोट पे हा रस्ता झालाच पाहिजे’’ अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकली. त्यामुळे वाद पेटला असतानाच भाजपच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी ‘‘यावर ॲकॅडमिक चर्चा होऊ शकते. अशी विधाने केल्यास कृतघ्नपणाचा दोष लागेल’’ अशा शब्दांत कानउघडणी केली. त्यानंतर मात्र या पदाधिकाऱ्याने पोस्ट हटविली आहे.

पण हा वाद थांबलेला नाही. पुणे महापालिकेने विधी महाविद्यालयाला पर्यायी मार्ग म्हणून वेताळ टेकडीवरून बालभारती ते पौड फाटा असा रस्ता प्रस्तावित केला आहे. हा रस्ता करताना टेकडी फोडावी लागणार आहे.

त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यावरणप्रेमींनी या प्रकल्पाला विरोध केला. प्रकल्पाविरोधात हजारो नागरिकांनी मोर्चा काढून निर्णय रद्द करण्याची मागणी केली. या आंदोलनाला खासदार मेधा कुलकर्णी यांनीही पाठिंबा दिला होता.

या आंदोलनामुळे भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण होत असल्याने नागरिकांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगून भाजपच्या वरिष्ठांनी यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही बालभारती पौड फाटा रस्त्यास विरोध, वेताळ टेकडीच्या संवर्धनाचा मुद्दा उपस्थित झाला. त्याला काँग्रेसनेही थेट पाठिंबा दिला, तर भाजपने विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखला जाईल, असे सांगितले होते.

मात्र लोकसभेसाठी मतदान झाल्यानंतर भाजपच्या आयटी सेलचे प्रदेश सहसंयोजक प्रसाद वक्ते पाटील यांनी ‘‘शिल्पा गोडबोले, सुषमा दाते यांच्यासह सर्वांनी काँग्रेसला मतदान केले आहे. त्यामुळे आता डंके की चोट पे बालभारती पौड फाटा रस्ता झालाच पाहिजे, ’’ अशी पोस्ट एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडियावर टाकली. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत निषेध केला.

‘पुणे-४’ ने कायम साथ दिली...

खासदार कुलकर्णी यांनीही पर्यावरणप्रेमींची बाजू उचलून धरली. ‘‘हा रस्ता व्हावा की नाही याबद्दल ॲकॅडमिक चर्चा होऊ शकते. परंतु ज्या ‘पुणे-४’ ने कायम साथ दिली, त्यांच्याबद्दल अशी विधाने केल्यास कृतघ्नपणाचा दोष नक्कीच लागेल.

मोठ्या रांगा लावून हे लोक भाजपच्या उमेदवारांना निवडून देत आले आहेत. मला वाटते पुण्यात अनेक सुजाण व तज्ज्ञ आहेत. ज्यांचे पुण्यावर प्रेम आहे. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा त्यांच्याशी मुद्द्यांवर आधारित चर्चा व्हायला हवी,’’ असे उत्तर कुलकर्णी यांनी वक्ते पाटील यांना दिले.

त्यानंतर वक्ते पाटील यांनी ती पोस्ट हटविली. अनेकांनी वक्ते पाटील यांच्या या भूमिकेवर टीका करत कुलकर्णी यांच्या भूमिकेचे स्वागत केले. दरम्यान, यासंदर्भात मेधा कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

वेताळ टेकडीसह शहरातील कोणत्याही टेकडीसंदर्भात आम्ही अभ्यास करूनच विषय मांडत असतो. जर कोणाला यावर शंका किंवा आक्षेप असेल तर चर्चा करून त्यांना मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करतो. पण आम्ही ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही. मेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे आभार.
- सुषमा दाते, वेताळ टेकडी बचाव कृती समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com