

एका प्रकरणात आरोपीला तुरुंगवास;
दुसऱ्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल
पुणे, ता. २१ ः शहरात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यातील एका प्रकरणात आरोपीला दोषी ठरवत न्यायालयाने शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घडलेल्या प्रकरणातील आरोपींवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. लवकरच खटला सुरू होर्इल.
सहा महिने तुरुंगवास
मोटारीने जोरात धडक देत दुचाकीवरील महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले कॉसमॉस बँकेचे तत्कालीन मानद अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर यांना न्यायालयाने सहा महिने तुरुंगवास आणि एक हजार २०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. भांडारकर रस्त्यावर जुलै २०१८ मध्ये झालेल्या या अपघातात अरुंधती हसबनीस (वय २९) यांचा मृत्यू झाला होता. विक्रम सुशील धूत (३५, रा. इंद्रजित अपार्टमेंट, शिवाजीनगर) यांनी याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. भारतीय दंड संहितेचे (आयपीसी) कलम २७९ (बेदरकारपणे वाहन चालवणे), कलम ३०४ (अ) मृत्यूस कारणीभूत ठरणे, मोटार वाहन कायद्याचे कलम १३२ (विशिष्ट प्रकारे मोटार उभी करून चालकाने घटनास्थळी थांबणे) आणि कलम १३४ (अपघातास कारणीभूत झालेल्या वाहनचालकाने जखमींना ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात घेऊन न जाणे. तसेच जवळच्या पोलिस ठाण्यास त्वरित खबर न देणे) नुसार ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्याचे कलम ११९ (वाहतूक चिन्हांचे पालन) नुसार डॉ. अभ्यंकर यांनी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
दुसऱ्या प्रकरणात दोषारोपपत्र
मद्यप्राशन करून भरधाव वेगात चारचाकी चालविणाऱ्या चालकाने पाच ते सहा वाहनांना दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. न. चिं. केळकर रस्त्यावर सहा ऑक्टोबर २०२३ ला रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला होता. बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक विश्वनाथ रामचंद्र राजोपाध्ये (वय ६०, रा. जलधारा सोसायटी, नारायण पेठ) यांचा या अपघातात मृत्यू झाला होता. वाहनचालक उमेश हनुमंत वाघमारे (वय ४८ रा. कुदळे पाटील कॉम्प्लेक्स, माणिकबाग, सिंहगड रस्ता) आणि नटराज बाबूराव सूर्यवंशी (वय ४४ ) यांना पोलिसांनी या गुन्ह्यात अटक केली होती. मद्याच्या नशेत वाहन चालवून अपघात, तसेच पादचाऱ्याच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कलम ३०४ पार्ट दोनसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पोलिस तपास पूर्ण झाला असून आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल झाले आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.