राज्य उत्पादन शुल्कालाच चढली नशा

राज्य उत्पादन शुल्कालाच चढली नशा
Published on

पुणे, ता. २१ : पंचवीस वर्षांवरील युवकांना मद्यविक्री करता येते, असा स्पष्ट नियम आहे. या नियमाची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागालादेखील आहे. परंतु या नियमांतर्गत पुणे शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने किती पब, रूफटॉफ हॉटेल आणि बारवर कारवाई केली, याची माहिती गुलदस्तातच आहे. कल्याणीनगर येथील दुघटनेच्या निमित्ताने हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. परिणामी या घटनेला राज्य उत्पादन शुल्क विभागदेखील तितकाच जबाबदार असल्याची टीका होत आहे.
कल्याणीनगर येथील दुर्घटनेवरून राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागाच्या कारभारावर अनेक प्रश्‍न उभे राहिले आहेत. शहरात परवानाधारक मद्यविक्री बारची संख्या मोठी आहे, तर बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या हॉटेल, पबची संख्याहीदेखील मोठी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना देताना त्यात वय वर्षे २५ च्या आतील तरुणांसाठी मद्यविक्री करता येणार नाही, अशी स्पष्ट अट घालण्यात आली आहे. परंतु वेळेच्या बंधनाप्रमाणेच या तरतुदीकडे बारचालकांकडून दुर्लक्ष करून केले जाते. उत्पादन शुल्क विभागही त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

साहेब मोबाईल बंद ठेवून सुट्टीवर
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागाकडून या संदर्भातील माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. या विभागाचे अधीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते सुट्टीवर आणि मोबाईल बंद असल्यामुळे माहिती मिळू शकली नाही. या तरतुदीचा भंग केल्याप्रकरणी किती हॉटेलवर कारवाई झाली, हे सांगता येणार नाही, असे नाव न देण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले. यावरून राज्य उत्पादन विभागाचा कारभार किती भोंगळ आहे, हेच स्पष्ट झाले आहे.

सर्व हॉटेलची तपासणी होणार
दरम्यान, कल्याणीनगरमधील घटनेनंतर जागे झालेल्या उत्पादन शुल्क विभागाने शहरातील सर्वच हॉटेलचालकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत. त्यासाठी दहा ते बारा पथके स्थापन करण्यात येणार असून, त्यांच्या माध्यमातून नियमांचे आणि वेळेचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात सूर्यवंशी म्हणाले, ‘‘२५ वर्षे वयाच्या आतील तरुणांना मद्यविक्री करण्यास परवानगी नाही. तशी विक्री कोणी करीत असेल, तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होणार.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com