शरद मोहोळ खूनप्रकरणी आरोपींविरुद्ध दोन हजार पानांचे आरोपपत्र

शरद मोहोळ खूनप्रकरणी आरोपींविरुद्ध दोन हजार पानांचे आरोपपत्र

पुणे, ता. २३ : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात गुन्हे शाखेने गुरुवारी (ता. २३) विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात १६ आरोपींविरुद्ध दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह इतर आरोपी सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

गुंड शरद मोहोळचा खून पाच जानेवारी रोजी दुपारी कोथरूड भागातील सुतारदरा भागात झाला होता. या घटनेनंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे-सातारा रस्त्यावर शिरवळजवळ मोटारीचा पाठलाग करून आठ आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून तीन पिस्तुलांसह तीन मॅगझीन, पाच काडतुसे आणि दोन मोटारी ताब्यात घेतल्या होत्या. जमिनीच्या आणि आर्थिक वादातून खून केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार याच्यासह साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या सूचनेनुसार साहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला. त्यानंतर गुन्हे शाखेकडून आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com