‘क्लस्टर विद्यापीठा’साठी पुण्यातून लवकरच प्रस्ताव

‘क्लस्टर विद्यापीठा’साठी पुण्यातून लवकरच प्रस्ताव

पुणे, ता. २३ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) फर्ग्युसन महाविद्यालय आणि बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) या दोन नामांकित महाविद्यालयांसह अन्य महाविद्यालयाचे मिळून क्लस्टर विद्यापीठ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी आवश्यक पूर्वतयारी झाली असून, येत्या महिन्याभरात ‘डिईएस’तर्फे क्लस्टर विद्यापीठ स्थापनेसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल. राज्य सरकारने परवानगी दिल्यास पुढील शैक्षणिक वर्षात संस्थेचे क्लस्टर विद्यापीठ स्थापन होईल, अशी माहिती सोसायटीच्यावतीने देण्यात आली.
‘डीईएस’ पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य यांनी ही माहिती दिली. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर, ‘डिईएस’चे उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे आदी उपस्थित होते.
आचार्य म्हणाले,‘‘समूह विद्यापीठ (क्लस्टर युनिर्व्हसिटी) स्थापन झाल्यास या दोन्ही महाविद्यालयातील सध्याचे अनुदानित अभ्यासक्रम समूह विद्यापीठात राबविण्यात येतील, तर विनाअनुदानित अभ्यासक्रम ‘डीईएस’ पुणे विद्यापीठामार्फत राबविले जातील. समूह विद्यापीठ स्थापन करण्याबाबत राज्य सरकारकडे काही मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. याबरोबरच डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सांगली आणि मुंबई येथेही स्वतंत्र समूह विद्यापीठांची निर्मिती होऊ शकते, त्याचाही निर्णय भविष्यात घेण्यात येईल.’’

संशोधनासाठी १३.५० कोटींचे अनुदान
सरकारकडून फर्ग्युसन महाविद्यालयाला ‘लाइफ सायन्सेस’ अंतर्गत तीन वेगवेगळ्या संशोधन प्रकल्पासाठी जवळपास १३.५० कोटी रुपयांचे अनुदान जाहीर झाले आहेत. अनुदानातील काही रक्कम महाविद्यालयाला मिळाली असून, उर्वरित रक्कम संशोधनाच्या विविध टप्प्यांवर वितरित केली जाणार आहे. या संशोधन प्रकल्पांवर फर्ग्युसन महाविद्यालय आणि ‘डीईएस’ पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्तपणे काम करण्यात येत आहे. अटल सेतू उभारणीचा जैवविविधेतेवर झालेला परिणाम, वातावरणातील बदलांचा लक्षद्विप बेटांवर होणारा परिणाम आणि पनवेल ते धारवाड येथील विकास प्रकल्पांचा पर्यावरणीय परिसंस्थांवरील परिणाम, अशा विषयांवर हे संशोधन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत तीन प्राध्यापक, पीएच.डीचे सहा विद्यार्थी सहभागी आहेत. आगामी काळात लाइफ सायन्सेस सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे डॉ. खांडेकर यांनी स्पष्ट केले. तसेच, ‘इंडियन नॉलेज सिस्टीम रिसर्च सेंटर’ स्थापन करण्यासाठी अनुदान मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू
‘डीईएस’ विद्यापीठात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, विज्ञान आणि गणित, ह्यूमॅनिटीज आणि सोशल सायन्स, डिझाइन आणि आर्ट्‌स, वाणिज्य आणि व्यवस्थापन या पाच प्रशाला सुरू केल्या आहेत. त्यातील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी दोन हजार २०० जागा उपलब्ध आहेत, असे डॉ. खांडेकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com