पुणेकरांचा पाठिंबा मिळाला, 
आता प्रतीक्षा न्यायाची....

पुणेकरांचा पाठिंबा मिळाला, आता प्रतीक्षा न्यायाची....

पुणे, ता. २३ : ‘‘पहिल्या दिवशी पैशाच्या जोरावर जे नाट्य घडले होते, ते चित्र आता पाच दिवसांनंतर बदलत आहे. पैसेवाल्यांसाठी कायदा नसतो, असे वाटत असताना पुण्यातील नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठविला. त्यामुळे चक्रे फिरली आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. आता आम्हाला न्यायाची प्रतीक्षा आहे,’’ अशा भावना कल्याणीनगर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अनिश अवधिया याचे मामा ज्ञानेंद्र सोनी यांनी व्यक्त केली.
अनिश हा मूळचा पाली (मध्य प्रदेश) येथील आहे. या दुर्घटनेनंतर सोमवारी (ता. २०) ‘सकाळ’शी बोलताना सोनी यांनी ‘‘पैसेवालों के लिये कानून नही होता है,’’ अशी भावना व्यक्त केली होती. पुणेकरांनी या घटनेचा समाजमाध्यमांमधून तीव्र शब्दांत निषेध केला होता. त्यानंतर घटनेच्या तपासाची चक्रे वेगाने फिरली. आज पुन्हा सोनी यांच्याशी संवाद साधल्यानंतर ते म्हणाले, ‘‘आमचे जे नुकसान व्हायचे होते ते झाले. तरुण अनिश आमच्यातून निघून गेला. तो ज्या पद्धतीने गेला ती घटना वाईट होती. त्यातील दोषी व्यक्ती पैसेवाल्या आहेत. त्यामुळे दोन जणांचे प्राण घेतल्यानंतरही त्याला सहजतेने जामीन मिळाला. यातून असंतोष निर्माण झाला होता. पण या विरोधात पुणेकरांनी आवाज उठविला. दोषींना पुणेकरांनी पाठीशी घातले नाही. त्यांच्या प्रयत्नांमुळे योग्य दिशेने पोलिस तपास करीत आहेत. त्या मुलाला आता सुधारगृहात पाठविले आहे. समाजात पुन्हा अशी घटना घडू नये, हा संदेश यातून जाणे आवश्यक होते. तो आता गेला आहे. तुमच्याकडे पैसे असतील, तर तुम्ही काहीही करू शकता, असा संदेश यापूर्वी गेला होता. तो आता बदलला आहे. त्यामुळे परत कोणाच्याही मुलाचा अशा पद्धतीने प्राण जाऊ नये, यासाठी हा कायदेशीर लढा महत्त्वाचा आहे. त्यात आम्हाला न्याय मिळेल, अशी आता अपेक्षा आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com