कष्टकऱ्यांच्या शुभेच्छा अन्‌ प्रेमात न्हाले बाबा !

कष्टकऱ्यांच्या शुभेच्छा अन्‌ प्रेमात न्हाले बाबा !

पुणे, ता. १ ः घरकामगार महिला, कचरावेचक, रिक्षा चालकांपासून ते अगदी हमालांपर्यंत प्रत्येकजण नटून - थटून, हातात पुष्पगुच्छ घेऊन आपल्या लाडक्‍या बाबांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देत होता. बाबांना शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता, त्यांच्या आयुष्यात सोनचाफ्याचा सुगंध पेरणारे, त्यांना कष्टाच्या जोरावर स्वाभिमानाने उभे करणारे तेच बाबा आज प्रत्येक कष्टकऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारताना त्यांच्या प्रेमात अक्षरशः न्हाऊन निघाले होते ! हा आनंद क्षण होता, हमाल, कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा !
एरवी आपण दादा, भाऊ, भाई अशांचा फटाक्‍यांच्या आतषबाजीत, कर्णकर्कश गाण्यांच्या आवाजात आणि घोषणाबाजीने डबडबलेले आणि रस्ते अडवून मोठ्या थाटामाटात साजरा होणारा वाढदिवस दररोजच अनुभवत असतो. पण, शनिवारी सकाळी मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे झालेला वाढदिवस मात्र त्याला अपवाद होता. वयाची ९४ वर्षे संपवून ९५व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या डॉ. बाबा आढाव यांचा वाढदिवस. डॉ. बाबा आढाव, पत्नी शीला आढाव यांच्यासमवेत साडेदहा वाजता हमाल भवन येथे दाखल झाले. त्यापूर्वीच अनेक घरकामगार महिला, कचरावेचक, रिक्षा चालक, हमाल आपल्या लाडक्‍या बाबांची आतुरतेने वाट पाहत बसले होते. बाबा आल्यानंतर सर्वांनीच त्यांना भेटण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली. डॉ. आढाव यांनी आत्मीयतेने शुभेच्छांचा स्वीकार केला. प्रत्येकाला नावाने आवाज देत बाबांनी त्यांच्यासमवेत फोटो काढण्यास ही खास वेळ दिला. तर त्यांच्या पत्नी शीला या देखील या कौतुक सोहळ्यात सहभागी झाल्या, यावेळी त्यांनी ही बाबांसमवेत येणाऱ्या प्रत्येकाला सोनचाफ्याचे फूल देऊन त्यांचा आनंद आणखी सुगंधित केला.
यावेळी हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, महात्मा फुले प्रतिष्ठान, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, राष्ट्र सेवा दल, पुणे मर्चंट असोसिएशन, पुणे समता परिषद, कागद काच पत्रा संघटना यांच्यासह विविध संघटनांनी ही त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सुभाष वारे, सुभाष लोमटे, अन्वर राजन, विकास देशपांडे, ॲड. शारदा वाडेकर, डॉ. शमशुद्दीन तांबोळी, मुकेश बामणे, डॉ. अभिजित वैद्य यांनी ही डॉ. आढाव यांना शुभेच्छा दिल्या.
----
‘सविनय कायदेभंगाची तयारी ठेवा’
मी सत्याग्रही वृत्तीचा माणूस आहे. महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंगाचा विचार मांडला. आपल्या घटनेला कायदेभंग मान्य नाही. पण सद्सद्विवेकबुद्धी लोकशाहीचा आधार आहे. अनेकदा लोकशाहीत संख्येचे गणित मांडून बहुसंख्य अल्पसंख्य या वादात सत्याचा विपर्यास होण्याचा धोका असतो. अशावेळी सुजाण, समंजस नागरिकांचे कर्तव्य आहे की, त्यांनी सत्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. त्यांनी सविनय कायदेभंग करण्याची तयारी ठेवावी. निवडणुका होतील, जातील पण जनतेला खरा कौल प्रस्थापित होण्यासाठी सविनय कायदेभंगाची तयारी ठेवावी, असे डॉ. आढाव यांनी यावेळी सांगितले.

2842

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com