वाचताना वेचू या, वेचलेले वाटू या !

वाचताना वेचू या, 
वेचलेले वाटू या !

पुणे, ता. २ : स्वत:चे नाव असलेलं पाकिट पोस्टाने घरी येणं... त्या पाकिटातील नवी कोरी पुस्तक... पुस्तकांच्या कोऱ्या करकरीत पानांना होणारा स्पर्श... अन् मुलांकडून होणारे त्या पुस्तकांचे वाचन...वाऽऽ वाऽऽ!! काय भन्नाट आहे ना!! अहो, पण ही भन्नाट कल्पना प्रत्यक्षात उतरलीयं बरं का! बालक पालक फाउंडेशनतर्फे विशेषकरून ग्रामीण, निमशहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ही पुस्तके वाचन साखळी प्रकल्पांतर्गत पोहचविली जात आहेत. या प्रकल्पाचा शुभारंभ नुकताच झाला आहे.
‘जून’ म्हणजेच शालेय शैक्षणिक वर्षाचा आरंभमास. हे औचित्य साधून एक जूनला प्रकल्पाचा शुभारंभ झाला. मे महिन्यात राज्यभरातून ऑनलाइन नावनोंदणी केलेल्या मुलांना ही पुस्तके दिली जात आहेत. विविध निकषांतून निवडलेल्या लाभार्थी विद्यार्थ्यांपर्यंत माहितीपूर्ण मराठी पुस्तके पोस्टाने घरपोच देण्यासाठी रवाना झाली आहेत. पुणे, सांगली, जळगाव, सोलापूर, रत्नागिरी, परभणी, पालघर, संभाजीनगर, हिंगोली, नाशिक, यवतमाळ, धाराशीव आणि नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलांची लाभार्थी म्हणून निवड केली गेली. या प्रकल्पाचे हे तिसरे वर्ष आहे. महाराष्ट्रातील फक्त ग्रामीण आणि निमशहरी भागातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात येते. वर्षभरात एक हजार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत प्रकल्प पोचविण्याचा फाउंडेशनचा मानस आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला पाच ते सहा वाचनीय मराठी पुस्तकांचा एक संच पाठविण्यात येतो. हे पुस्तक त्याने स्वत: वाचावे, पुस्तकात वाचलेले इतरांना सांगावे, हा प्रकल्पाचा उद्देश आहे.

मुलांना वाचनाची आवड लागावी, याबरोबरच घरकेंद्री वाचन करण्याचा प्रयत्न आहे. मुलांना स्वत:च्या हस्ताक्षरात घराचा पत्ता पाठविण्यास सांगितले जाते. ‘वाचताना वेचू या, वेचलेले वाटू या’ असा संस्कार मुलांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न वाचन साखळी प्रकल्पातून करण्याचा मानस आहे. १३ जिल्ह्यांतील निवडक मुलांना मराठी पुस्तके पाठवली जात आहेत.
- विनायक जोशी,
संस्थापक-अध्यक्ष, बालक पालक फाउंडेशन

वाचन साखळी प्रकल्पाबाबत अधिक माहितीसाठी संपर्क : ८८५६८६२७११

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com