न्यायवैद्यकीय तपासणीची ‘ससून’ करणार ‘एसओपी’

न्यायवैद्यकीय तपासणीची ‘ससून’ करणार ‘एसओपी’

पुणे, ता. २ : ससून रुग्णालयात आणल्या जाणाऱ्या आरोपी किंवा रुग्णाची न्यायवैद्यकीय तपासणी कशा पद्धतीने करावी, त्याच्या नोंदी कागदपत्रांवर कशा घ्याव्यात याचे प्रशिक्षण वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या न्यायवैद्यकीय प्रकरणांच्या तपासणीतील त्रुटी दूर करून आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्याची प्रक्रिया ससूनच्या प्रशासनाने सुरु केली आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या रक्तनमुन्याच्या अदलाबदलीनंतर खडबडून जागे झालेल्या ससूनच्या प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. एखाद्या प्रकरणातील आरोपी किंवा दुर्घटनेतील जखमी रुग्णाला वैद्यकीय तपासणीसाठी ससूनमध्ये आणले जाते. दर महिन्याला ससूनमध्ये सुमारे सहाशे न्यायवैद्यकीय प्रकरणे नोंदविली जातात. काही घटना किरकोळ स्वरूपाच्या असतात. काही प्रकरणे मात्र अतिगंभीर असतात. अशावेळी कागदपत्रांवर नोंदलेला प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो. न्यायालयात चालविल्या जाणाऱ्या खटल्याच्या संदर्भात नोंदींना महत्त्व असते. या पार्श्वभूमिवर न्यायवैद्यकीय प्रकरणातील नोंदी ठेवण्याचे शास्त्रीय प्रशिक्षण वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्याचे नियोजन प्रशासन करीत असल्याची माहिती मिळाली.
अधिकाऱ्यांची क्षमता वृद्धी
ससूनमध्ये ‘एमबीबीएस’ झालेले डॉक्टर वैद्यकीय अधिकारी किंवा मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असतात. ते नव्याने वैद्यकीय व्यवसायात आलेले असतात. त्यांना पुढे वैद्यकीय क्षेत्रात कारकीर्द घडविण्याची मोठी संधी असते. न्यायवैद्यकीय प्रकरणात कशा पद्धतीने नोंदी ठेवाव्यात, निरीक्षणे काय नोंदवावीत, तपासणी कशी करावी, त्याची माहिती प्रत्यक्ष त्यांना काम करताना दिली जाते. आता वैद्यकीय अधिकाऱ्यांची क्षमतावृद्धी करण्यासाठी विशेष प्रशिक्षणाचे मॉड्यूल तयार करण्यात येईल. त्यात महाविद्यालयातील वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य घेण्यात येईल.
---
दबावाचे व्यवस्थापन
पोलिस आरोपी किंवा रुग्णाला ससूनमध्ये घेऊन येतात. त्यावेळी ती व्यक्ती अल्कोहोलच्या प्रभावाखाली आहे का, हे तपासले जाते. तसेच त्याबाबतच्या नोंदी घेताना डॉक्टरांवर दबाव आणला जातो. कल्याणीनगर अपघात प्रकरणात मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर याच्यावर दबाव आणला गेल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे आरोपीची किंवा फिर्यादीची कायदेशीर प्रक्रिया कोणाचाही दबाव न घेता पूर्ण करण्याचाही भाग या प्रशिक्षणात असेल. त्यादृष्टिने दबावाचे व्यवस्थापन करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, असेही समजते.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com