दोन्ही पक्षांची जल्लोषाची जय्यत तयारी

दोन्ही पक्षांची जल्लोषाची जय्यत तयारी

पुणे, ता. ३ ः पुणे लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या (ता. ४) जाहीर होत असताना भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून जल्लोषाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पेढे, लाडूची ऑर्डरही देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे ढोलताशा, डीजे लावला जाणार आहे. गुलालाचीही मोठ्या प्रमाणात खरेदीही करण्यात आली आहे.
पुण्यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत झाली आहे. ही निवडणूक अटीतटीची होणार ठरण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकू असा विश्‍वास व्यक्त केला आहे.
मंगळवारी (ता. ४) सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु होईल. १० वाजल्यानंतर निवडणुकीचा कल येण्यास सुरुवात होणार आहे. भाजपतर्फे चौकाचौकात टीव्ही, एलइडी स्क्रीन लावून निवडणूक निकाल बघण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला असून ३७० किलो पेढे वाटण्याची तयारी केली आहे. याशिवाय ४०० किलो लाडू, पेढेही ते तयार ठेवणार आहेत. डीजेचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
महायुतीतर्फे टिळक चौकात सायंकाळी चार वाजता जल्लोष केला जाईल. त्यानंतर पक्ष कार्यालयात जल्लोष केला जाणार आहे. रात्री मुरलीधर मोहोळ हे कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत, असे दुष्यंत मोहोळ यांनी सांगितले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी धंगेकर यांच्या विजयाचा विश्‍वास व्यक्त केला. ते म्हणाले,‘‘काँग्रेस भवन येथे विजयाचा मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जाईल. त्यावेळी गुलाल उधळला जाईल. पेढे वाटले जातील. सहा विधानसभा मतदारसंघ, प्रत्येक प्रभागात आनंदोत्सव साजरा करण्याच्या सूचनाही आम्ही दिल्या आहेत. कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्तपणे तयारी सुरु केली आहे.’’
---
कार्यकर्त्यांनी फलक लावले सुद्धा
पुणे शहरात भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निकाल लागण्यापूर्वीच आपल्या नेत्याचे खासदारपदी निवड झाल्याचे आणि त्यांना शुभेच्छा देणारे फलक लावून गुलाल उधळला आहे.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com