‘जय श्रीराम’च्या जयघोषात ‘भगवा’ जल्लोष

‘जय श्रीराम’च्या जयघोषात ‘भगवा’ जल्लोष

पुणे, ता. ४ : ‘जय श्री रामऽऽ’, ‘आले रे आले, अण्णा आले,’ ‘अबकी बार ४०० पार’ अशी जोशपूर्ण घोषणाबाजी... भगव्या गुलालाची मुक्त उधळण...डिजेच्या भिंतींचा दणदणाटऽऽ..अन्‌ सोबतीला कार्यकर्त्यांचा अखंड वाहणारा उत्साह अशा जल्लोषपूर्ण वातावरणात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कोथरूड येथील जनसंपर्क कार्यालय परिसरात मोठ्या दिमाखात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची शिगेला पोहचलेली उत्सुकता, त्याच उत्सुकतेपोटी शहरातील एकूणच वातावरणात झालेला बदल, एकामागोमाग एक येणारी निकालाची माहिती आणि मतमोजणीच्या सकाळच्या सत्रातच पुणे लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले. आणि भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी जल्लोषास दिमाखदार सुरुवात केली. मोहोळ यांच्या कोथरूड येथील जनसंपर्क कार्यालयात दुपारी बारा वाजल्यापासूनच आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. प्रत्येक फेरीत मोहोळ यांचे मताधिक्य वाढताना दिसत असल्याने कार्यकर्त्यांनी भगव्या गुलालाची मनसोक्त उधळण केली. शेकडो किलो भगवा गुलाल यावेळी उधळला गेला. या जनसंपर्क कार्यालयात सकाळी आठ वाजताच कार्यकर्त्यांनी येण्यास सुरुवात केली. उत्तरोत्तर मताधिक्यांत भर पडत असताना कार्यालयात येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संख्येतही भर पडत होती. एवढंच नव्हे तर कर्वे रस्त्यावर कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा फडकावीत आनंदोत्सव साजरा केला.

एकीकडे मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात आनंदोत्सव साजरा होत असताना भाजपच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात मात्र शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे पुणे शहर मध्यवर्ती कार्यालय हे वर्षाच्या सुरुवातीलाच म्हात्रे पुलाजवळील डी. पी. रस्त्यावर स्थलांतरित करण्यात आले आहे. पुणे लोकसभा निवडणुकीतील प्रचाराची रणनीती, नियोजन याच कार्यालयात पार पडले. एवढंच नव्हे, तर भाजपच्या अनेक नेत्यांनी याच कार्यालयातून कार्यकर्ते, पत्रकारांशी संवाद साधला. परंतु, पुण्यात विजयी वाटचाल करत असताना देखील हे कार्यालय मंगळवारी शांत होते. मोजकेच कार्यकर्ते दिवसभर कार्यालयात असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, संध्याकाळनंतर मध्यवर्ती कार्यालयात विजयोत्सव साजरा करण्यासाठी डिजे, ध्वनिवर्धक, लाईटस्‌ची व्यवस्था मात्र करून ठेवण्यात आली होती.

‘त्या’ फलकाने वेधले नागरिकांचे लक्ष
कोथरूड येथील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्ते हातात फलक धरून विजयोत्सव साजरा करत असल्याचे दिसून आले. ‘काय म्हणता पुणेकर, कुठे हरवला धंगेकर’ या फलकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. रस्त्यावरून ये-जा करणारे अनेक नागरिक या संदेशाच्या फलकांचे छायाचित्र आपल्या मोबाईल कॅमेऱ्याद्वारे टिपत असल्याचे पाहायला मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com