काँग्रेस भवनात निरव शांतता

काँग्रेस भवनात निरव शांतता

पुणे, ता. ४ : पुणे लोकसभेच्या जागेसाठी अटीतटीच्या झालेल्या लढतीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर पिछाडीवर पडल्यानंतर काँग्रेस भवनात शुकशुकाट पसरला. गेले दोन महिने कार्यकर्त्यांचा सातत्याने वावर या ऐतिहासिक वास्तूमध्ये होता; पण काँग्रेसच्या उमेदवाराचा पुण्यातून सलग तिसरा पराभव झाल्यानंतर या परिसरात नीरव शांतता पसरली होती.

भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली तर, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करणाऱ्या धंगेकर यांच्यावर काँग्रेसने पुन्हा विश्वास दाखविला. धंगेकर यांच्यामागे काँग्रेसने राज्यातील पूर्ण ताकद उभी केली. राज्यात पहिल्या टप्प्यात विदर्भातील निवडणुका झाल्या. काँग्रेसचे तेथील राज्य पातळीवरील सहा आजी-माजी आमदार पुण्यात दाखल झाले. त्यामुळे काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेला वेग आला. दररोज काँग्रेस भवनात कार्यकर्ते, नेते, पक्षाचे समर्थक यांची लगबग सुरू होती. विविध नेत्यांच्या पत्रकार परिषदा, निवडणुकीचे नियोजन, त्यासाठी आवश्यक व्यवस्था यामुळे काँग्रेस भवन परिसर गजबजला होता. आज सकाळपासून धंगेकर पिछाडीवर असल्याची माहिती पुढे येऊ लागली. मतमोजणीच्या एकेका फेरीनंतर मोहोळ यांना आघाडी मिळू लागली. त्याचा थेट परिणाम काँग्रेस भवनावर दिसू लागला. कार्यकर्ते, नेते यांनी काँग्रेस भवनाकडे पाठ फिरवली. काँग्रेसच्या शहर पातळीवरील काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात हजेरी लावली होती.

माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यापर्यंत पुणे हा काँग्रेसला बालेकिल्ला होता. काँग्रेस भवनातून शहराची सूत्रे हलवली जात होती. त्याच काँग्रेस भवनाला पुणे लोकसभा मतदारसंघात सलग तिसरा पराभव पाहावा लागत असल्याच्या वेदना कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून जाणवत होत्या. देशात २०१४ ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत डॉ. विश्वजित कदम, २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मोहन जोशी आणि आता धंगेकर अशा सलग तीन उमेदवारांचा पुण्यात भाजपने पराभव केला. कसबा हा धंगेकर यांचा बालेकिल्ला. त्यामुळे काँग्रेस भवनात यंदा विजयाचा गुलाल उधळला जाणार, असा विश्वास कार्यकर्त्यांना होता. त्याची जय्यत तयारीही केली होती. काँग्रेस भवन पंधरा वर्षांनंतर विजयाच्या गुलालाने रंगणार, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे तेथे आलेल्या मोजक्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरची उदासी स्पष्ट दिसत होती.

‘थोडी खुशी, थोडा गम’
काँग्रेस भवनमध्ये बसून निवडणुकीचे निकाल ऐकण्याची मोठी परंपरा आहे. पूर्वी रेडिओवर कानात प्राण आणून काँग्रेस कार्यकर्ता येथे निकाल ऐकत असे. आता दूरचित्रवाणी पडद्यावर निकाल पाहिला जातो. आजही काँग्रेस भवनातील ही परंपरा कायम असल्याचे चित्र दिसले. शहरात काँग्रेसच्या उमेदवाराची पीछेहाट होत असली तरीही राज्यात आणि देशात काँग्रेसला ऊर्जितावस्था मिळत असल्याचा आनंद या कार्यकर्त्यांना होता. त्यामुळे ‘थोडी खुशी, थोडा गम’ असे वातावरण अनुभवायला मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com