‘स्वरानंद’ पुरस्कारांचा रौप्यमहोत्सवी सोहळा

‘स्वरानंद’ पुरस्कारांचा रौप्यमहोत्सवी सोहळा

‘स्वरानंद’ प्रतिष्ठानचा ५३ वा वर्धापनदिन व रौप्य महोत्सवी पुरस्कार वितरण सोहळा ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ६) सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. हा समारंभ कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित केला आहे. त्यानिमित्त....
- प्रकाश भोंडे, कार्यकारी विश्वस्त

मराठी रसिकजनांची मराठी गाण्याबद्दल अभिरुची वृद्धींगत व्हावी म्हणून स्वरानंद संस्थेने १९७० मध्ये ‘आपली आवड’ नावाने पहिला रंगमंचीय प्रयोग केला अन् श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या संस्थेने ५० वर्षांहून अधिक काळ वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे एक हजारांहून अधिक प्रयोग करून राज्यभर रसिकांना श्रवणानंद दिला. ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ या सुधीर मोघे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रमाने मराठीजनांना मंत्रमुग्ध केले. आजवर अनेक ज्येष्ठ संगीतकार, कवी, गायक-गायिकांचे गौरव सोहळे करून त्यांच्याच गीतांद्वारे मानवंदना दिली. अशाच सामाजिक बांधिलकीचा ‘स्वरानंद प्रतिष्ठान’ने एक अपूर्व आविष्कार २५ वर्षांपूर्वी मराठी संगीतप्रेमींपुढे आणला.
मराठी ललित संगीताच्या क्षेत्रात अनेक तरुण गायक-गायिका, संगीतकार, वादक आपली सर्जनशीलता सतत जागी ठेवून संगीत साधना करीत असतात व स्वतःच्या प्रयोगशील कलाविष्कारातून रसिकांना श्रवणानंद देण्याची धडपड करतात. पण त्यांच्या अशा प्रयत्नांची सुयोग्य दखल घेतली जात नाही. त्यांचे यथोचित कौतुक व्हायला हवे, तरच भविष्यात असेच चांगले काम करण्याची उमेद त्यांच्यात राहील. ही निकड लक्षात घेऊन स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे अशा गुणवंत कलाकारांना पुरस्कार देण्यास १९९८ पासून सुरुवात केली आहे.

गायिका माणिक वर्मा यांच्या स्मरणार्थ शास्त्रीय व सुगम संगीताच्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी बजावणाऱ्या‍ गायक/गायिकेला हा पुरस्कार दिला जातो. ‘माणिक वर्मा पुरस्कारा’चा पहिला मान अनुराधा मराठे यांना मिळाला. ‘स्वरानंद’ने प्रयोगशील संगीतकाराला ‘केशवराव भोळे’ पुरस्कार देण्यास सुरूवात केली. याचे पहिले मानकरी ठरले डॉ. सलिल कुलकर्णी. डॉ. प्रभा अत्रे यांनी त्यांच्या भगिनी डॉ. उषा वाघ-अत्रे यांच्या स्मरणार्थ ललित संगीताच्या क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या गायक-गायिकेला पुरस्कार देण्याचा प्रस्ताव प्रथम ‘सुगम’ संस्थेकडे व नंतर ‘स्वरानंद’कडे दिला. विभावरी आपटे, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, बेला शेंडे, प्रियांका बर्वे यांना दिला आहे.
स्वरानंद परिवारातील व्हायोलिन वादक सतीश गदगकर (अमेरिका) यांनी त्यांच्या मातोश्री अ‍ॅड. विजया गदगकर यांच्या स्मरणार्थ खास वादकांसाठी स्वतंत्र पुरस्कार सुरू केला. रंगमंचीय कार्यक्रमात ध्वनी संयोजकांचे कौशल्य अनमोल असते, हे जाणून ‘स्वरानंद’ने त्यांचाही गौरव करण्याचे ठरविले. त्यानुसार आज या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com