मॉन्सून महाराष्ट्रात दाखल

मॉन्सून महाराष्ट्रात दाखल

पुणे, ता. ६ : दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) गुरुवारी दाखल झाले. धरणातील पाण्याची वेगाने कमी होणारी पातळी, शहरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, ग्रामीण भागांत हंडाभर पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट यामुळे राज्यातील प्रत्येकाचे डोळे मॉन्सूनच्या प्रगतीकडे लागले होते. अखेर मॉन्सूनने राज्यातील रत्नागिरी, सोलापूर येथे दमदार हजेरी लावली. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पुण्या-मुंबईसह राज्याच्या इतर भागात मॉन्सून मुसंडी मारेल, असा अंदाज हवामान खात्याने गुरुवारी व्यक्त केला.
मॉन्सून ३० मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर सहा दिवस प्रवास करत त्याने कर्नाटक, गोवा मार्ग तळकोकणात प्रवेश केला. एकाच दिवसात मॉन्सूनने रत्नागिरी, सोलापूर, मेढक, भद्राचलम, विजयनगर येथे हजेरी लावली. राज्यातील पुढील प्रवेशासाठी पोषक वातावरण असल्याने पुढील दोन दिवसांमध्ये विविध भागांमध्ये मॉन्सूनची दमदार हजेरी लागेल, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.
अरबी समुद्रातून प्रवाहाचा वेग अधिक बळकट होत असल्याने मोसमी वारे भारत भूमीवर प्रवास करत आहेत. केरळमध्ये वेळेआधी (३० जून) दाखल झाल्यानंतर वेग धरलेल्या मॉन्सूनने मंगळवारी (ता. ४) सर्वसाधारण वेळेच्या एक दिवस आधीच गोव्यासह, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागात प्रगती केली होती. त्यानंतर गुरुवारी (ता. ६) मॉन्सूनने गोव्याचा उर्वरित भाग, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणाच्या बहुतांश भागासह महाराष्ट्रात प्रगती केली. महाराष्ट्रातील संपूर्ण सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागातर्फे जाहीर झाले आहे. बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागातही मॉन्सूनने प्रगती केली आहे.

चार दिवस आधीच दाखल
मॉन्सून यंदा तळ कोकणसह महाराष्ट्रात साधारणतः चार दिवस आधीच दाखल झाला आहे. वाटचालीस पोषक हवामान असल्याने दोन ते तीन दिवसांत उर्वरित कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, छत्तीसगड, दक्षिण ओरिसाच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com