रस्त्यांना तळ्यांचे स्वरूप, नागरिक पाण्यात; तरीही प्रशासन ढिम्मच

रस्त्यांना तळ्यांचे स्वरूप, नागरिक पाण्यात; तरीही प्रशासन ढिम्मच

पुणे, ता. ६ : शहरात मंगळवारी (ता. ४) झालेल्या पावसाने रस्ते, चौक, भुयारी मार्गांमध्ये अक्षरशः पाण्याची तळी तयार झाली होती. त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होऊन नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. महापालिका प्रशासनाने पावसाळी गटारे, नालेसफाईची कामे व्यवस्थित पार न पाडल्याने मॉन्सूनपूर्व पावसातच पुणेकरांची दाणादाण उडाल्याची स्थिती होती.
शहरातील अनेक ओढे, नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलून तेथे मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदी, नाले व ओढ्यांना पूर येऊन पाणी रस्त्यांवर, सोसायट्या व घरांमध्ये घुसत आहे. त्यातच ओढे, नाले, पावसाळी गटारांमधील गाळ काढणे, सफाई करण्याच्या कामाकडे महापालिका प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील पहिल्यांदा पावसाचा फटका पुणेकरांना सहन करावा लागला. मंगळवारी शहरात झालेल्या पावसामुळे मुख्य रस्ते, चौक, भुयारी मार्गांमध्ये पाणी साठल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, शहरात पाणी साठण्याच्या ठिकाणांबाबतची माहिती पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून महापालिका प्रशासनाला देण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी पाणी साठू नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबतचे पत्रही वाहतूक शाखेने महापालिकेला दिले आहे. तरीही, महापालिकेने सुधारणा करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक पोलिस, कार्यकर्ते व नागरिकांनाच रस्त्यावर साठलेले पाणी काढण्याची वेळ आली.

पावसाचे पाणी नेहमी साठणारी ठिकाणे
कसबा पेठेतील दारूवाला पूल, फडके हौदाजवळील देवजीबाबा चौक, लक्ष्मी रस्त्यावरील हमजेखान चौक, पद्मावती, येरवडा येथील गुंजन चित्रपटगृह चौक, रामवाडी येथील भुयारी मार्ग, धानोरी, धानोरी जकात नाका, आंबेडकर शाळा, गोल्फ चौकाजवळील आयबीएम कंपनी, कल्याणीनगर जंक्‍शन, आळंदी चौक, नगरवाला स्कूल, रामवाडी क्षेत्रीय कार्यालय, वडगाव शेरी येथील अरनॉल्ड स्कूल, कळस फाटा, कॉमर्स झोन, कोरेगाव पार्क येथील ब्लू डायमंड हॉटेल व सेंट मीराज शाळेसमोरील रस्ता, ताडीवाला रोड, सिंहगड रस्त्यावरील हिंगणे, माणिकबाग, धायरी उंबऱ्या गणपती चौक, खोराड वस्ती, आनंदनगर, आनंद विहार, मधुकर हॉस्पिटल परिसर, रेसीडेन्सी क्‍लब चौक अशा अनेक ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यांवर तुंबण्याचे प्रकार घडले. त्याचा सर्वाधिक फटका स्थानिक नागरिकांना बसला. धनकवडी, पद्मावती, सहकारनगर, महेश सोसायटी, चव्हाणनगर कमान या ठिकाणी तर रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. शंकर महाराज मठ उड्डाणपुलाजवळील चव्हाणनगर कमान येथे दुचाकीस्वार पाण्याच्या प्रवाहात वाहत चालल्याची घटना घडली. अनेक ठिकाणी कार, रिक्षा, दुचाकी यांसारखी वाहने पाण्यात अडकून पडली होती. सांडपाण्याचा निचरा होण्याची व्यवस्थाच नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साठण्याच्या घटना घडल्या.

रामवाडी भुयारी मार्गामध्ये पाणी तुंबण्याचा प्रकार घडत आहे. रामवाडी येथील झोपडपट्टी व गृहप्रकल्पांमधील सांडपाणी भुयारी मार्गामध्ये जात आहे. त्याविषयी महापालिकेच्या विविध विभागांना पत्र पाठविले आहे. तरीही, प्रशासन त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. महापालिका प्रशासन प्रश्‍न सोडविण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखविण्याचे काम करत आहे.
-कनीज सुखराणी, सामाजिक कार्यकर्त्या

धानोरी परिसरातील ओढे, नाले बांधकामासाठी बुजविले आहेत. नैसर्गिक प्रवाह बदलल्याने ओढे, नाल्यांचे पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. प्रत्येक पावसाळ्यात लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसूनही प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहत नाही.
-विवेक बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com