होर्डिंगसाठी वृक्षतोड थांबवा ः वंदना चव्हाण

होर्डिंगसाठी वृक्षतोड थांबवा ः वंदना चव्हाण

पुणे, ता. ८ ः शहरात होर्डिंग लावण्यासाठी सर्रासपणे सर्वत्र वृक्षतोड सुरू आहे. त्यामुळे विद्रुपीकरण वाढत आहे आणि हिरवी चादर घटत आहे. आकाशचिन्ह नियमावलीचे पालन करून असे प्रकार रोखावेत, अन्यथा याविरोधात आंदोलन केले जाईल. वातावरण बदलामुळे वादळ, मुसळधार पावसाचा धोका वाढत असताना अशा प्रकारे होर्डिंगला परवानगी नको, अशी भूमिका माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पर्यावरण सेलतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रदेश प्रतिनिधी समीर निकम, राष्ट्रवादी अर्बन सेलचे शहराध्यक्ष नितीन कदम, प्रवीण कुल या वेळी उपस्थित होते.
शहरात होर्डिंग उभारण्यासाठी वृक्षतोड केली जात आहे. होर्डिंगच्या आडवी येणारी झाडे छाटली जातात. त्याला महापालिकेकडून परवानगी मिळतेच कशी? असा प्रश्‍नही चव्हाण यांनी उपस्थित केला.
समीर निकम म्हणाले, ‘‘राज्य सरकारने आकाशचिन्हसाठी नियमावली तयार केली आहे. त्यात जाहिरात फलक लावायच्या ठिकाणी ४० मीटरच्या आत एकाच रांगेत कोणतेही झाड असेल तर त्यांच्या आकारासह दर्शविणाऱ्या त्या स्थानाच्या नकाशाच्या दोन प्रती जोडाव्यात, असे नमूद केले आहे. पण नवीन होर्डिंग उभे करताना या नियमाचे पालन होते का? उलट त्यावर काही दिवसांनी कुऱ्हाड चालवली जाते.’’

तर आयुक्त जबाबदारी घेणार का?
महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनाच वृक्ष अधिकाऱ्याचे अधिकार आहेत, त्याचप्रमाणे होर्डिंगलादेखील तेच परवानगी देतात. त्यामुळे होर्डिंग उभे करताना ज्या ज्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली, ते सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, प्रत्यक्ष जागेवर पाहणी करणारे मिस्त्री यांना निलंबित करावे लागेल. महापालिका आयुक्तांची यासाठी तयारी आहे का? असा प्रश्‍नही या वेळी निकम यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com