‘आपला दवाखाना’चे वाढले दुखणे

‘आपला दवाखाना’चे वाढले दुखणे

पुणे, ता. ३० ः सरकारी भाडे परवडणारे नसल्याने काही जागा मालकांनी पुणे महापालिकेच्या ‘आपला दवाखाना’साठी नकार दिल्याने आता संबंधित वाखान्यांसाठी नवीन ३६ जागा शोधण्याची कसरत महापालिकेला करावी लागणार आहे. २२ जागा मालकांनी भाडेकरार करण्यास सकारात्मकता दाखविली आहे.
राष्ट्रीय नागरी आरोग्य योजनेअंतर्गत ‘आपला दवाखाना’ ही सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून काही महिन्यांपासून जागांचा शोध घेतला जात होता. मार्च महिन्यात आरोग्य विभागाला ५८ दवाखाने सुरू करण्यासाठी काही जागा मिळाल्या. त्यामुळे लवकरच ‘आपला दवाखाना’ सुरू होईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र ही सेवा तांत्रिक प्रक्रियेतच अडकून पडली.

अशी आहे स्थिती
१) ढोले पाटील, नगर रस्ता, येरवडा-कळस-धानोरी, औंध-बाणेर, वारजे, सहकारनगर, धनकवडी, कसबा पेठ, भवानी पेठ अशा सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये दोन किंवा तीन ठिकाणी ‘आपला दवाखाना’ सुविधा सुरू करण्यासाठी ४६ जागा उपलब्ध झाल्या
२) महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून संबंधित जागांचे मूल्यांकन. संबंधित जागांसाठी सरकारी दराप्रमाणे भाडेनिश्‍चिती. परंतु सरकारी भाडे कमी असल्याने २४ जागा मालकांनी जागा देण्यास नकार दर्शविला. २२ जागा मालकांनी मान्यता दर्शविली.
३) आता आणखी ३६ जागांचा महापालिकेच्या आरोग्य विभागाला नव्याने शोध घ्यावा लागणार आहे. जागा शोधण्याचे काम क्षेत्रीय कार्यालयांच्या मदतीने केले जाते, मात्र सध्या लोकसभा निवडणूक सुरू असल्याने ही प्रक्रिया संपल्यानंतरच जागांचा शोध घेण्याचे काम सुरू होण्याची शक्‍यता

केंद्र सरकारच्यावतीने व महापालिकेमार्फत ‘आपला दवाखाना’ ही सुविधा दिली जाणार आहे. दवाखान्यांसाठी जागेचे मूल्यांकन झाले, मात्र सरकारी भाडे कमी असल्याने २२ जागा मालकांनी नकार दिला आहे. त्यामुळे उर्वरित ३६ दवाखान्यांसाठी पुन्हा एकदा जागा शोधावी लागणार आहे.
- डॉ. भगवान पवार, प्रमुख, आरोग्य विभाग, पुणे महापालिका

वैशिष्ट्ये
- दवाखान्याच्या वेळेत तज्ज्ञ डॉक्‍टर्स रुग्णांसाठी उपलब्ध असणार
- वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेवक असे मनुष्यबळ पुरविण्यात येणार
- दररोज दुपारी दोन ते रात्री या वेळेत दवाखाना सुरू राहणार
- नोकरदार, कष्टकऱ्यांना दैनंदिन कामे उरकून दवाखान्यात जाणे शक्‍य होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com