घनकचरा विभागाला मनुष्यबळाची कमतरता

घनकचरा विभागाला मनुष्यबळाची कमतरता

पुणे, ता. २ : शहर स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागावर मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामना करण्याची वेळ आली आहे. प्रमुख आरोग्य निरीक्षक ते मुकादमापर्यंतच्या अनेक जागा रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आला आहे. विशेषतः अनेक ठिकाणी मुकादम नसल्याने बिगारी कर्मचाऱ्यांनाच मुकादमाच्या कामाची जबाबदारी पार पाडावी लागत आहे.
शहरातील चौक, रस्ते, पदपथ, बाजारपेठा, मंडई, बाजारपेठा, खाऊगल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला दिसून येतो. कचरा टाकू नये, असे फलक असलेल्या ठिकाणीही सर्रासपणे कचरा टाकला जातो. सकाळी मात्र बहुतांश भागातील रस्त्यांवरील कचरा काढून तेथे स्वच्छता केलेले समाधानकारक चित्र आपल्या नजरेस पडते. महापालिकेच्या घनकचरा विभागाकडील अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांच्या पहाटेपासून सुरू असलेल्या कामामुळे ही स्वच्छता दिसून येते. उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारावरच स्वच्छतेचे काम सध्या सुरू आहे.
घनकचरा विभागाकडून शहर स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली जाते. मात्र, या विभागाला मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. प्रमुख आरोग्य निरीक्षक, उपआरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मुकादम अशा विविध श्रेणींमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. मनुष्यबळाचा अभाव असल्याने सध्या काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवरच कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. सण, समारंभ, धार्मिक कार्यक्रम, व्हीआयपी दौरे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे या विभागातील कर्मचाऱ्यांना सतत सतर्क राहावे लागते. जादा काम करण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. अतिरिक्त काम करण्यास नकार दिल्यास किंवा काम करण्यास थोडा विलंब झाल्यास तत्काळ गैरहजेरी मांडली जात असल्याची कैफियत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मांडली. विभागाने मनुष्यबळ भरल्यास हा ताण कमी होण्याची शक्‍यताही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

घनकचरा विभागातील आवश्‍यक पदांवरील ४० जणांच्या भरतीसाठीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. आगामी सहा महिन्यांमध्ये कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी भरती करण्यासाठीची प्रक्रिया करण्यात येईल.
-संदीप कदम, प्रमुख, घनकचरा विभाग, महापालिका.

घनकचरा विभागाकडील पदे मंजूर पदे रिक्त पदे
प्रमुख आरोग्य निरीक्षक - ४ ४
उपआरोग्य निरीक्षक - ४ २
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक - १३ १३
आरोग्य निरीक्षक (क्षेत्रीय कार्यालय) - २५० १०४
मुकादम -४५३ ३०७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com