नेते म्हणतात

नेते म्हणतात

तोडफोडीचे राजकारण, भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांना उमेदवारी देणे, सत्तेचा गैरवापर करणे आदींमुळे भारतीय जनता पक्षाची महायुती मतदारांच्या मनातून साफ उतरली आहे. या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा आता खलनायक म्हणून निर्माण झाली आहे. त्याचा फटका महायुतीला या निवडणुकीत बसलेला दिसेल, असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी वर्तविला.

भाजपच्या तोडफोडीच्या राजकारणाला मतदार कंटाळले

प्रश्न - लोकसभा निवडणुकीत कोणत्या मुद्यांभोवती प्रचार सुरू आहे ?
उत्तर - महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, ठराविक उद्योग, कंपन्यांनाच मिळणारी सवलत, निवडणूक रोखे गैरव्यवहार, शेतमालाला हमी भाव न मिळणे, कृषी उत्पादनांवर घालण्यात आलेली निर्यात बंदी, घसरता मानवी विकास निर्देशांक हे मुद्दे नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. महागाईमुळे कुटुंबाचेच अर्थकारण बिघडले आहे तर, बेरोजगारीमुळे युवक हवालदिल झाले आहेत. त्यातून देशापुढे गंभीर संकट निर्माण होऊ शकते. राममंदिर झाले, ही चांगली बाब आहे. परंतु, तो निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही. कलम ३७० हटविणे, ‘एनआरसी’ची अंमलबजावणी, यांना नागरिकांचा वाढता विरोध आहे.

प्रश्न - महायुती, महाविकास आघाडी यांत कोणाला सर्वाधिक जागा मिळेल ?
उत्तर - महाविकास आघाडीला मतदारांचा प्रतिसाद वाढता आहे. आमच्या पक्षाचे नेते शरद पवार तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांच्या प्रचारसभांना मिळणाऱ्या प्रतिसादाने आमचा हुरूप वाढला आहे. रोज चित्र बदलत असून ते आमच्यासाठी आशादायी आहे. भाजपच्या तोडफोडीच्या राजकारणाला मतदार कंटाळले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल समाजात नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. त्याचा फटका महायुतीला निश्चित बसेल. महायुतीपेक्षा निश्चितच जास्त जागा महाविकास आघाडीला मिळेल.

प्रश्न - शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष व्यक्तिगत झाला आहे ?
उत्तर - महाराष्ट्रात आत्तापर्यंत समंजस राजकीय संस्कृती होती. वैचारिक मतभेद असले तरी ते व्यक्तिगत स्तरावर नव्हते. परंतु, गेल्या तीन-चार वर्षांत भाजपमुळे राजकारणाचा स्तरच घसरला आहे. त्यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, आंदोलने केली, चौकशा लावल्या त्यांनाच उमेदवारी देऊन त्यांचा प्रचार करण्याची वेळ भाजपच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. मतदारांनाही हे आवडलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस फोडून त्यांनी राजकारणाचा विचका केला आहे. पवार साहेबांवर रोज बेफाम आरोप होत आहेत. परंतु, आमची भिस्त मतदारांवर आहे. त्यांना सगळे समजते आहे. शरद पवारांनी कधीही स्तर सोडून प्रचार केलेला नाही. त्यांच्या समाजाभिमुख भूमिकेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

प्रश्न - तापमानामुळे मतदानाची टक्केवारी कमी होईल, अशी भीती सगळ्याच राजकीय पक्षांना वाटत आहे ?
उत्तर - देश वाचविणे सद्यःस्थितीत गरजेचे आहे, कारण सत्तेच्या उन्मादात राज्यघटनाच बदलण्यासाठी भाजप पुढे सरसावत आहे. देशात एकाधिकारशाही सुरू आहे. लोकांना हे सगळं समजत आहे. त्यामुळे केंद्र सरकारमधील सत्ताधाऱ्यांबद्दल सर्वसामान्यांत रोष निर्माण झाला आहे. हा घटक पेटून उठला आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल, अशी अपेक्षा आहे.
----------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com