पुण्यात नव्वद हजार दिव्यांग मतदार
पुणे, ता. ३१ ः विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक घटकातील मतदाराने मतदान करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. पुण्यातील २१ विधानसभा मतदारसंघात ९० हजारांहून अधिक दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांना मतदान करताना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून समन्वय अधिकाऱ्यांसह अठ्ठावीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र सुसूत्रीकरणानंतर ३ हजार २२५ मतदान केंद्रांची ठिकाणे आणि एकूण ८ हजार ४६२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. तर जिल्ह्यात ९० हजार १३४ दिव्यांग मतदार आहेत. मतदारसंघनिहाय सर्वेक्षण करून मतदार यादी भागनिहाय दिव्यांग मतदारांचे ध्वजांकन आणि स्थानांकन करण्यात आले आहेत. जिल्हा दिव्यांग कक्षासाठी जिल्हा जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांची समन्वय अधिकारी तसेच साहाय्यक अधिकारी म्हणून पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारसंघनिहाय दिव्यांग कक्षासाठी समन्वयक म्हणून २१ व जिल्हा दिव्यांग कक्षासाठी एक असे एकूण २२ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चाकांच्या चार हजार खुर्च्या
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्ह्यात चाकांच्या ४ हजार १३६ खुर्च्या, ८ हजार ४६२ भिंग तसेच मदतीसाठी ५ हजार ९६३ स्वंयसेवक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट गाइड विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे.
अशा आहेत उपाययोजना
- सर्व मतदान केंद्रांवर अडथळा विरहित वातावरण, रॅम्पची सुविधा
- तळ मजल्यावर मतदान केंद्र, दिव्यांग मतदारांना घरापासून मतदान केंद्रावर येण्या-जाण्यासाठी वाहन व्यवस्था
- स्वतंत्र रांग, दिशादर्शक फलक, प्रतीक्षालय, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, वाहनतळ, प्रथमोपचार पेटी
- मदत कक्ष, ब्रेल लिपीतील साहित्य, कर्णबधिर दिव्यांगांसाठी दुभाषक
- मदतीसाठी ९२२६३६३००२ क्रमांक उपलब्ध
दिव्यांग प्रवर्गनिहाय मतदार
अस्थिव्यंग - २२ हजार २३९
कर्णबधिर - ३ हजार ८६४
अंध किंवा अल्पदृष्टी - ७ हजार ९१९
अन्य दिव्यांग- ५६ हजार ११२
एकूण दिव्यांग - ९० हजार १३४
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांसाठी चाकाची खुर्ची, भिंग, रॅम्प, वाहन व्यवस्था, स्वयंसेवकाची नेमणूक आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे.
- डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

