केंद्रीय मंत्रिमंडळात ७२ वर्षांत पाचवे निर्वाचित पुणेकर

केंद्रीय मंत्रिमंडळात ७२ वर्षांत पाचवे निर्वाचित पुणेकर

पुणे, ता. ९ : मुरलीधर मोहोळ हे जनतेतून निवडून आलेले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री झालेले गेल्या ७२ वर्षांतील पाचवे पुणेकर ठरले. त्यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रिमंडळात २८ वर्षांनी पुणेकराला संधी लाभली. निवडून आल्यानंतर थेट मंत्रिमंडळात स्थान मिळालेले ते पुण्याचे दुसरे खासदार ठरले.
पहिल्या लोकसभेपासून आत्ताच्या अठराव्या लोकसभेपर्यंत पुण्याने १३ खासदार दिले. देश स्वतंत्र झाल्यानंतर १९५२ मध्ये झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत नरहर ऊर्फ काकासाहेब विष्णू गाडगीळ काँग्रेसकडून निवडून आले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले होते. त्यांच्याकडे वीज, सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे अशी खाती होती.
खासदार म्हणून निवडीनंतर लगेच मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी काकासाहेब गाडगीळ यांच्यानंतर मोहोळ यांना मिळाली. काकासाहेब गाडगीळ यांच्यानंतर १७ वर्षांनी मोहन धारिया यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यांच्याकडे सुरुवातीला (१९७१ ते १९७७) गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याचे राज्यमंत्री पद होते. त्यानंतर १९७७ ते १९७९ या काळात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या सरकारमध्ये धारिया यांनी वाणिज्य, नागरी पुरवठा, सहकार ही खाती सांभाळली.
धारिया यांच्यानंतर विठ्ठलराव गाडगीळ यांनी सलग तीन वेळा संसदेत पुण्याचे नेतृत्व केले. १९८० ते १९८४ या काळात इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे माहिती व प्रसारण मंत्रालय होते. गाडगीळ यांच्यानंतर अण्णा जोशी यांना १९९१ मध्ये पुणेकरांनी संसदेत पाठविले. मात्र त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नव्हती.
विठ्ठलराव गाडगीळ यांच्यानंतर १२ वर्षांनी पुण्यातून लोकसभेवर सुरेश कलमाडी निवडून गेले. त्यांना १९९५ मध्ये रेल्वे राज्यमंत्रिपद मिळाले. त्यावेळी पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते. गाडगीळ यांच्यानंतर विठ्ठलराव तुपे, प्रदीप रावत, दोन वेळा सुरेश कलमाडी, अनिल शिरोळे आणि यांनी पुण्याचे प्रतिनिधित्व केले. कलमाडी यांच्यानंतर २८ वर्षांनी पुण्याच्या खासदाराचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला.
राज्यसभेवर निवड झालेल्या पुण्याच्या प्रकाश जावडेकर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संसदीय कामकाज, पर्यावरण-वने, मनुष्यबळ विकास तसेच माहिती आणि प्रसारण अशा विविध खात्यांची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली.
..........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com