पालखी सोहळ्यासाठी ठेवा समन्वय

पालखी सोहळ्यासाठी ठेवा समन्वय

पुणे, ता. १० : जिल्ह्यात वेळेत पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालये, वाहतूक, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा पुरविण्यासह त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वयाने काम करावे, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिला.
जगद्‍गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते.
पालखी सोहळा सुरक्षित व्हावा यासाठी सर्व संबंधित तालुक्यांनी ‘इन्सीडन्स रिस्पॉन्स सिस्टीम’चा (आयआरएस) प्रभावी उपयोग करावा. सोहळ्यातील संबंधित विभागविषयक निश्चित कामकाजासाठी संपर्क अधिकारी नेमावा. पावसाळा सुरू झाल्याने पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्याचे स्रोत तपासून ते निर्जंतूक करून घ्यावेत. पाणीपुरवठ्यासाठी आवश्यकता असल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडून पाणी मिळेल, यासाठी प्रयत्न करता येतील. पाणीपुरवठ्याचे टँकर आणि शौचालयांच्या संख्येत वाढ करण्यासाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड मनपा तसेच स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
पालखी मार्गावरील दवाखान्यांमध्ये औषधे उपलब्ध ठेवावीत. पालखीच्या रस्त्यावर कोठे अतिक्रमणे असल्यास ती तत्काळ काढून टाकण्यात यावीत. सुरक्षेच्यादृष्टीने मार्गावरील, नगरपालिका हद्दीतील सर्व जाहिरात फलकांची (होर्डिंग्ज) तपासणी करावी. अवैध आणि असुरक्षित सर्व जाहिरात फलक काढून टाकावेत. पालखीला अडथळा येऊ नये आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पालखी महामार्गावरील कामे पूर्ण करण्यासह अडथळे काढावेत. ‘एनएचएआय’ने पोलिस, उपविभागीय अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त पाहणी करून त्यानुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही ते म्हणाले.


अशी आहे व्यवस्था
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी एक हजार ५००, संत तुकाराम महाराज पालखीसाठी एक हजार आणि संत सोपान महाराज पालखीसाठी पालखी मुक्कामी, विसाव्याच्या ठिकाणी २०० शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे. तिन्ही पालख्यांसाठी मिळून १२ तात्पुरती निवारा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तर स्तनदा माता आणि बालकांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. याशिवाय १४० रुग्णवाहिका आणि ५७ रुग्णवाहिका पथक, ११२ वैद्यकीय अधिकारी, ३३६ आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी २०० टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com