Murlidhar Mohol :
Murlidhar Mohol : sakal

Murlidhar Mohol : मंत्री मोहोळ यांच्यासमोर ‘पुरंदर’चे आव्हान; विमानतळ प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा

दहा वर्ष होत आली तरी केवळ चर्चेच्या फेऱ्यात अडकलेल्या पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आव्हान केंद्रीय नागरी उड्डाण राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर असेल.

पुणे : दहा वर्ष होत आली तरी केवळ चर्चेच्या फेऱ्यात अडकलेल्या पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आव्हान केंद्रीय नागरी उड्डाण राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर असेल. पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्राच्या विकासाला बूस्टर देणाऱ्या या प्रकल्पाला ते गती देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुरंदर तालुक्‍यातील सात गावांमधील दोन हजार ८३२ हेक्‍टर जागेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा राज्य सरकारने सप्टेंबर २०१६ मध्ये केली. केंद्र आणि राज्य सरकार, विमानतळ प्राधीकरण व संरक्षण मंत्रालयाने जागेसाठी हिरवा कंदील दाखविला. त्यानंतर भूसंपादनाचा मोबदला निश्‍चित करण्याबरोबरच प्रशासकीय तयारीही पूर्ण झाली. केवळ भूसंपादनासाठीचा निर्णय प्रलंबित होता. मात्र गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतर पर्यायी जागेचा प्रस्ताव पुढे आला. केंद्र सरकारकडून त्यास प्रथम मान्यता देण्यात आली, मात्र त्यानंतर दिलेली परवानगी रद्द करण्यात आली.

दरम्यान, राज्यात सत्तापालट झाले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने पुरंदरच्या जागेवर शिक्कामोर्तब केले व जागेचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरासाठी नव्या विमानतळाची गरज बोलून दाखविली, तर जेजुरी येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदरमधील नियोजित विमानतळासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्या पाठोपाठ उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निवेदन केले. ‘

पुरंदर विमानतळाबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपली एकत्रित बैठक होईल. त्यात सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेण्यात येईल. येत्या दोन महिन्यांत प्रश्‍न मार्गी लागलेला असेल,’ असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे विमानतळाचे काम अखेर मार्गी लागण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले होते, मात्र त्यासही तीन महिने लोटले असले तरी कोणतीही हालचाल झालेली नाही. दरम्यान, पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने १९९५ नंतर पुण्याला प्रथम केंद्रात राज्य मंत्रिपद मिळाले. मोहोळ यांना सहकार तसेच नागरी उड्डाण राज्यमंत्री पद मिळाले आहे. त्यांच्या निवडीने हा प्रश्‍न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

सध्याच्या विमानतळाशी संबंधित आव्हाने
- पुणे विमानतळ अपुऱ्या जागेत असल्याने प्रवासी सुविधांवर विपरीत परिणाम
- जागतिक दर्जाचे शहर असलेल्या पुण्यातून केवळ दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे
- पुणे विमानतळाचा विस्तार होणे आवश्यक
- विमानतळाची धावपट्टी कमी असल्याने मोठे विमान उतरू शकत नाही, परिणामी क्षमता असूनही पुण्याहून अमेरिका, युरोप येथे विमानसेवा सुरु होऊ शकत नाही
- प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन टर्मिनल बांधण्यात आले, त्याचे उद््घाटन होऊन तीन महिने उलटूनही ते प्रवाशांसाठी अद्याप खुले नाही
- विमानतळाची जागा कमी असल्याने केवळ दहा ‘पार्किंग बे’, ‘पार्किंग बे’ कमी असल्याने विमानतळावर विमान वाहतुकीची क्षमता कमी
- विमानतळ व प्रवाशांच्या सोयीसाठी तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) बॅरेक सुस्थितीत नाहीत. शिवाय अतिरिक्त जवानांची नियुक्ती झाल्यावर बॅरेक कमी पडणार
- विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी १३ एकर जागेची अधिग्रहण होणार आहे, मात्र त्यास अद्याप गती नाही
- कमी दृश्यमानता असताना वैमानिकांना मदत करणारी कॅट ३ ही अत्याधुनिक यंत्रणा नसल्याने धुके आणि पावसात धावपट्टी बंद करण्याची एटीसीवर नामुष्की

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com