संजीव मठ यांचे ‘बच्चनमय’ घर

संजीव मठ यांचे ‘बच्चनमय’ घर

Published on

पुणे, ता. १० : हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांनी तर रसिकांवर गारूड केलेच; मात्र चित्रपटांच्या पलीकडेही त्यांचे व्यक्तिमत्त्व चाहत्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यावर प्रभाव पाडणारे आहे. त्यामुळे आजही अनेक चाहत्यांचे आयुष्य ‘बच्चनमय’ असल्याचे दिसून येते. असेच एक चाहते म्हणजे संजीव मठ.

अमिताभ बच्चन यांचे निस्सीम चाहते असलेल्या संजीव मठ यांचे संपूर्ण आयुष्यच ‘बच्चनमय’ असल्याचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या घरी गेल्यावर येतो. त्यांचे संपूर्ण घर बच्चन यांच्या चित्रपटांच्या पोस्टरने व्यापले असून ‘शहेनशहा’ म्हटले जाणाऱ्या बच्चन यांच्या सर्व चित्रपटांचा संग्रह त्यांनी केला आहे. ‘‘चित्रपटांचे स्वरूप बदलत असले, तरी माझ्या अमिताभ बच्चन यांच्याशी निगडित आठवणी आजही तितक्याच ताज्या आहेत. त्या जपण्यासाठी मी सर्व प्रयत्न केले आहेत. ही सदनिका मला प्रत्येक वेळी नवीन ऊर्जा देते’’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
संजीव मठ हे एका बहुराष्ट्रीय कंपनीत ऑडिओ ॲण्ड व्हिडिओ उत्पादनाच्या विक्री विभागाचे राष्ट्रीय प्रमुख आहेत. ही त्यांची व्यावसायिक ओळख. त्यांच्या ओळखीचा दुसरा पैलू म्हणजे ते अमिताभ बच्चन यांचे मोठे चाहते आहेत. सात वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या सदनिकेत बच्चन यांच्याविषयीची माहिती आणि साहित्य जमा करण्यास सुरुवात केली. कॉलेजच्या काळापासूनच त्यांना अमिताभ बच्चन यांची आवड होती. त्यांच्या चित्रपटांमधून मिळणाऱ्या प्रेरणेने त्यांनी त्यांच्या सर्व चित्रपटांचे पोस्टर्स, डीव्हीडी आणि विविध स्मरणचिन्हांचा संग्रह करण्याचा निश्चय केला आणि अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर तो त्यांनी पूर्ण केला.

संजीव यांच्या सदनिकेत सध्या तीसहून अधिक पोस्टर्स लावले आहेत. बच्चन यांचे सर्व चित्रपट त्यांच्याकडे संग्रहित आहेत. एवढेच नव्हे, तर बच्चन यांच्याविषयीची अनेक पुस्तकेही त्यांच्याकडे आहेत. आपल्या या अनोख्या छंदाबद्दल ते सांगतात की, ‘‘मला कॉलेजच्या काळातच अमिताभ बच्चन यांची प्रचंड आवड निर्माण झाली होती. त्यांचा एकही सिनेमा असा नाही, जो मी पाहिलेला नाही. म्हणूनच त्यांच्या विषयीचा हा संग्रह तयार करण्याचा निर्णय घेतला. पोस्टर्स मिळवताना अनेक अडचणी आल्या. तंत्रज्ञानातील बदल, मर्यादित स्रोत होते. पण मी हा छंद जपण्याचा निर्धार केला. मित्रांनी यात खूप मदत केली. मी केलेला हा संग्रह नागपूरमध्ये स्वतः अमिताभ बच्चन यांना दाखवला होता. तो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय क्षण होता.’’

क्रिकेट आणि माधुरी दीक्षित यांचाही संग्रह
संजीव यांनी त्यांच्या सदनिकेत अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच माधुरी दीक्षित आणि क्रिकेट यांच्याशी संबंधितही संग्रह तयार केला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विजयांचे आणि आनंदी क्षणांचे छायाचित्र त्यांनी जपून ठेवले आहेत. तसेच, भारतीय संघाच्या नेतृत्वाशी संबंधित विशेष क्षणांचेही फोटो त्यांनी मांडले आहेत. त्यांच्या सदनिकेत आल्यानंतर नव्वदच्या दशकात परत गेल्यासारखे वातावरण जाणवते.

कुटुंब, व्यवसाय, नोकरी या सर्व जबाबदाऱ्यांमुळे आपले आयुष्य सतत धावपळीत असते. या धावपळीच्या आयुष्यात मनाला दिलासा देणारी एक जागा किंवा गोष्ट असायला हवी. माझ्यासाठी ही सदनिका म्हणजे मनःशांती देणारे ठिकाण आहे. आपल्याला आवड असेल, तर कोणताही छंद आपण आयुष्यात जपू शकतो, हेच मी या माध्यमातून सांगू इच्छितो.
- संजीव मठ,
अमिताभ बच्चन यांचे चाहते


संजीव यांच्या सदनिकेतील अमिताभ बच्चन यांचे पोस्टर.

Marathi News Esakal
www.esakal.com