डॉक्‍टरांच्‍या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री
वीस औषध विक्रेत्यांवर कारवाई, राज्यात १०७ विक्रेत्‍यांचे परवाने निलंबित

डॉक्‍टरांच्‍या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री वीस औषध विक्रेत्यांवर कारवाई, राज्यात १०७ विक्रेत्‍यांचे परवाने निलंबित

Published on

पुणे, ता. १० : ‘कोल्‍ड्रीफ’ कफ सिरपच्‍या सेवनाने बालकांचा मृत्‍यू झाल्‍यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात डॉक्‍टरांच्‍या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) कफ सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी पुण्‍यात २० औषधविक्रेत्‍यांवर कारणे दाखवा नोटीस व निलंबनाची कारवाई केली आहे. पुणे जिल्‍हा औषध विक्रेत्‍या संघटनेने केवळ औषध विक्रेत्‍यांवरच लक्ष केंद्रित न करता, बनावट औषधे तयार करणाऱ्या कंपन्‍या व ऑनलाइन औषधविक्री करणाऱ्या कंपन्‍यांवरही कारवाईचा बडगा उगारण्‍यात यावा, अशी मागणी ‘एफडीए’कडे केली आहे.
मध्‍य प्रदेशात ‘कोल्‍ड्रीफ’ पिल्यानंतर ९ हून अधिक बालकांचा मृत्‍यू झाला. या कफ सिरपमध्‍ये ‘डायथीलिन ग्‍लायकॉल’ हे विषारी रसायन आढळून आले. त्‍यानंतर ‘एफडीए’ने या कफ सिरपची विक्री व वितरण बंद केले. त्‍यानंतर देशभरात इतर कंपन्‍यांच्‍या कफ सिरपची तपासणी सुरू केली. त्‍यामध्‍ये ‘रेडनेक्स फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे ‘रेसिफ्रेश टीआर’ व ‘शेप फार्मा प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे ‘रिलाईफ’ या दोन कफ सिरपमध्‍ये प्रमाणापेक्षा जास्‍त ‘डायथीलिन ग्‍लायकॉल’ आढळले. त्‍यानंतर या दोन्‍ही कंपन्‍यांचा साठा प्रतिबंधित करून, त्‍याच्‍या वितरणावर देशभरात बंदी घातली. त्‍यानंतर ‘रेसिफ्रेश टीआर’चा १३ लाख रुपयांचा साठा पुण्‍यात जप्त केला आहे.
दरम्‍यान, ‘पुणे एफडीए’ने इतर कंपन्‍यांच्‍या कफ सिरपचे नमुने गोळा करण्‍याची व त्‍यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्‍याची मोहीम सुरू केली आहे. ही तपासणी करत असताना काही औषध विक्रेते हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे विक्री करत असल्याचे आढळून आले. विशेषतः कफ सिरप आणि सर्दी-खोकल्याच्या उपचारासाठी वापरली जाणारी काही औषधे ही गैरवापराच्या धोक्यात असल्याने त्यावर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यानुसार पुणे शहर व जिल्ह्यातील २२ औषध विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. २० प्रकरणांमध्ये नियमभंग आढळून आला आहे. त्‍यापैकी काहींना कारणे दाखवा नोटीस तर काहींवर निलंबनाची कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे विभागाचे सह आयुक्‍त गिरीश हुकरे यांनी दिली.
विना प्रिस्क्रिप्शन औषधे देणाऱ्या राज्‍यातील ८८ औषध विक्रेत्यांना औषधांची विक्री त्वरित बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच १०७ औषध विक्रेत्यांचे औषध विक्रीचे परवाने निलंबित किंवा रद्द का करू नयेत, यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
..............
‘‘आम्‍ही प्रत्‍येक औषध विक्रेत्‍यांना प्रिस्‍क्रीप्‍शनशिवाय औषधांची विक्री करू नका, असे सांगितलेले आहे. कारवाईत ‘एफडीए’ ने संतुलन ठेवणे आवश्यक आहे. निकृष्ट दर्जाचे औषध बाजारात येणे ही औषध निर्मिती प्रक्रियेतील चूक किंवा गुणवत्ता नियंत्रणातील त्रुटीचे द्योतक आहे. अशा प्रकरणांत अंतिम विक्रेता म्हणजेच केमिस्टला दोषी धरणे अन्यायकारक आहे. औषध तयार करणे, गुणवत्ता तपासणी करणे आणि परवानग्या मिळविणे ही जबाबदारी उत्पादक कंपन्यांची असते. केमिस्ट फक्त शासनाच्या परवान्यानुसार, अधिकृत वितरकांकडून बिलासह औषधे विक्रीस ठेवतो. औषध विक्रेत्यांकडे प्रयोगशाळा किंवा वैज्ञानिक साधने नसल्याने ते औषधांची रासायनिक गुणवत्ता तपासू शकत नाहीत. केमिस्ट हे समाजातील रुग्ण आणि औषध यांच्यामधील दुवा आहे.’’
– अनिल बेलकर, सचिव, पुणे जिल्‍हा केमिस्‍ट असोसिएशन
..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com