मुळशीत कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्रांचे वाटप
पुणे, ता. १० ः आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्याच्या उद्देशातून मुळशी तालुक्यातील ५५० कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जनजाती कल्याण आश्रम, मुळशी तसेच उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी, तहसील कार्यालय मुळशी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प-घोडेगाव, पंचायत समिती मुळशी आणि रोहन फेडरेशनतर्फे आयोजित हा कार्यक्रम मुळशी तालुक्यातील माले येथील हुतात्मा नाग्या महादू कातकरी समाज विकास केंद्रात झाला. याप्रसंगी आमदार शंकर मांडेकर, मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चोबे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुण्याच्या जनजाती कल्याण आश्रमाचे अध्यक्ष प्रकाश धोका, रोहन बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक सुहास लुंकड उपस्थित होते.
डॉ. दबडघाव म्हणाले, ‘‘विकासाची कौशल्ये आत्मसात करून आपल्या गावात राहून स्वतःसह गावाच्याही विकासात योगदान देणे महत्त्वाचे आणि अगत्याचे आहे. सगळ्यांनी मिळून गाव मोठे करण्याचा प्रयत्न करायला हवा.’’ युवराज लांडे यांनी सूत्रसंचालन केले.