‘शुगर’ ३१ होऊनही ‘डिस्चार्ज’; तिसऱ्या दिवशी मृत्यू ‘हा काय आश्रम आहे,’ अशी जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरची विचारणा

‘शुगर’ ३१ होऊनही ‘डिस्चार्ज’; तिसऱ्या दिवशी मृत्यू
‘हा काय आश्रम आहे,’ अशी जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरची विचारणा
Published on

ज्ञानेश्‍वर भोंडे
सकाळ वृत्‍तसेवा
पुणे, ता. १८ ः ‘शुगर’ ३१ पर्यंत कमी झालेल्या, घरी एकटा राहणाऱ्या प्रौढ रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांच्या विनवणीचा औंध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला पाझर फुटला नाही. ‘हा काय आश्रम आहे का,’ असा जाब विचारत अपमानित करून त्याला ‘डिस्चार्ज’ घेण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी घरी या रुग्णाचा अंत झाला.
गिरीश मोरे (वय ४४, रा. येरवडा) असे मृताचे नाव आहे. याबाबत व्हायरल झालेल्या चित्रफितीनुसार हा प्रकार सुमारे दोन महिन्यांपूर्वी घडला. दहा जानेवारी रोजी फिजिशियन डॉ. अमोल बोंद्रे त्याच्याशी संभाषण करीत असल्याचे चित्रफितीत दिसते. रुग्णाच्या नातेवाइकांनी हे चित्रीकरण केले.
मोरे यांना तीन जानेवारीला पुरूषांच्‍या मेडिसिन कक्षात दाखल करण्यात आले होते. डॉ. बोंद्रे यांनी ‘जुनाट व्‍यसनाधीनता व मधुमेह’ (क्रॉनिक अल्‍कोहोल अँड टाइप २ डायबिटिस) असे निदान केले. उपचारानंतर साखरेचे प्रमाण नियंत्रणात आले होते, पण दहा जानेवारीला ते ३१ पर्यंत खाली गेले. रुग्णाच्या पायांवरही सूज होती. त्‍यामुळे चालताही येत नसल्याने रुग्णासह नातेवाइकांनी आणखी काही दिवस रुग्णालयात ठेवावे अशी विनवणी केले. डॉ. बोंद्रे यांनी काही समस्‍या नसल्‍याचे सांगत डिस्चार्ज घेण्‍यास सांगितले.
‘सकाळी माझी शुगर ३१ इतकी खाली आली होती. त्‍यामुळे मला चालताही येत नव्‍हते. माझे पाय सूजलेले आहेत. घरी मी एकटा राहतो. काळजी घेणारे कोणी नाही. मला आणखी काही दिवस येथे उपचारासाठी राहूद्या,’ असे आर्जव करणाऱ्या रुग्‍ण व नातेवाइकांच्या शब्दांचा डॉ. बोंद्रे यांच्यावर परिणाम झाला नाही. तू बरा झाला आहेस, असे ते सांगत होते.
---
....तर नक्कीच जगले असते
रुग्णाच्या नातेवाइकांनी सांगितले की, ‘पत्‍नी व मुले त्यासोबत राहत नव्हती. त्यामुळे तो घरी एकटाच राहायचा. १० जानेवारीला डॉक्‍टरांनी डिस्चार्ज घ्यायला लावला तेव्हा रुग्णालयात फारसे रुग्णही नव्हते. तीन दिवसांनी ते घरात मृतावस्‍थेत आढळले. त्‍यांना आणखी काही दिवस उपचार मिळाले असते तर ते नक्‍कीच जगले असते.’
........
हा रुग्‍ण ‘क्रॉनिक अल्‍कोहोलिक’ होता. उपचारानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आल्‍याने डॉक्‍टरांनी त्‍याला घरी सोडले होते. याबाबत अधिक चौकशी करण्‍यात येईल.
- डॉ. नागनाथ यमपल्‍ले, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, जिल्‍हा रुग्‍णालय, औंध
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com