ॐकार गणेश

ॐकार गणेश

Published on

हिंदू धर्माच्या उपास्य देवतांमध्ये गणपतीचे स्थान आणि महत्त्व अनन्यसाधारण आहे. गणपती शब्दब्रह्म ओंकाराचे प्रतीक आहे. ॐकाराचे व्यक्त स्वरूप म्हणजे गणपती. ओंकाराचे सगुणरूप असलेला गणपती हा वैदिक देव आहे. सर्व आचार्य आणि संतांनी ॐकार गणेशाला प्रारंभी वंदन केले आहे. गणपती हाच साक्षात परमात्मा असून त्याच्यापासून सकळ देव निर्माण झाले. तो अमर, निर्गुण, निराकार असा देवाधिदेव आहे. गाणपत्य संप्रदायात ओंकार स्वरूप मानून त्याची उपासना केली जाते.
- सुप्रिया खासनीस

ओंकार प्रधान रूप गणेशाचे
कळे तिन्ही काळाचे आत्मज्ञान
आपल्या हिंदू धर्मियांच्या सण व उत्सवाचे स्वरूप धार्मिक आहे. सर्वांनी आनंद घ्यावा व द्यावा, निसर्ग आणि कला यांचा रस घ्यावा, तसेच आपले जीवन समृद्ध करावे हा सण उत्सव निर्मितीमागचा ऋषिमुनींचा हेतू दिसून येतो. देवदेवतांना सांघिक सुखाचा अनुभव मिळावा म्हणून ओंकाराने पृथ्वी निर्माण केली. तेव्हा उत्सवाचा शुभारंभ यज्ञ-यागातून केला गेला, असे सांगितले जाते. सण उत्सवाची मुहूर्तमेढ त्या वेळी रोवली गेली असे समजतात. सण व उत्सव समारंभांचा आदिदेव ॐकार गणेश आहे. म्हणून मंगलप्रसंगी गणेशाचे पूजन केले जाते. श्री गणेश सुखकर्ता, विद्या- वैभवदाता असा आहे.
गणेश ओंकार स्वरूप असल्यामुळे अथर्वशीर्षाचा प्रारंभ ओंकाराने झालेला आहे. ओंकार या शब्दाने गणेशाच्या स्वरूपाचा आपल्याला परिचय होतो. उपनिषदांमध्ये ओंकाराच्या साडेतीन मात्रांचे विवेचन केलेले दिसून येते. ॐकाराच्या अकार, उकार आणि मकार अशा मात्रा आहेत. ॐकाराचे स्तवन ज्याच्या माध्यमातून होते तो प्रणव. ओंकाराचे विराट व सूक्ष्मरूप जो दाखवितो, त्याची स्तुती करतो तो प्रणव ओंकार. म्हणूनच प्रणव ओंकाराचे ध्यान करावे असे सांगितले जाते. गणेश उपासनेत प्रणव ॐकाराला प्रथमस्थान दिले आहे. सर्व उपनिषदांनी ‘ॐ’ चे स्तवन केले आहे. सर्व वैदिक वाङ्‌मयाने ज्याची उपासना केली आहे तो म्हणजे ओंकार आणि म्हणूनच गणक ऋषींनी म्हटले आहे... ॐ नमस्ते गणपतये.

अथर्वशीर्षाचे महत्त्व
गणेश हा ओंकार रूपाने निर्गुणब्रह्म तर शिव-पार्वती पत्ररूपाने सगुणब्रह्म म्हणजे ईश्वर आहे. गणेशाच्या ॐ या नामात जसे गूढ संकेत आहेत, तसे गणेशाच्या रूपातही आहेत. गणेशाच्या १२ नावांपैकी गजानन या नावात त्याचे स्वरूप दाखविले आहे. गजमधील ‘ग’चा अर्थ संस्कृत ओंकार आणि ‘ज’ म्हणजे जन्मणारा. या ओंकार स्वरूपातून सर्व सृष्टीची निर्मिती जो करतो तो गजानन. शिवाय गणेशाच्या सोंडेलाही प्रतीकात्मक अर्थ आहे. सोंड म्हणजे चांगले-वाईट निवडण्याची नीरक्षीर विवेक क्षमता. ओंकार दर्शन किंवा विवेक अर्थाने गणेश हा गजानन आहे. चार वेदांपैकी अथर्ववेद हा ओंकाराच्या श्‍वासातून निघाल्यानंतर तो अथर्व ऋषींनी प्रथम पाहिला. त्यामुळे या वेदाला अथर्ववेद नाव पडले. त्यातील मंत्रांना अथर्वशीर्ष असे म्हणतात. गाणपत्य संप्रदायामध्ये अथर्वशीर्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेदात किंवा वेदाच्या आरंभी सर्वत्र ओंकार आहे. ॐ हे गणेशाचे स्वरूप आहे असे सांगणाऱ्या श्रुती स्मृतीही आहेत.

‘ओंकार गणेश’ क्षेत्र
गणपती हा गणांचा पती म्हणजेच शौर्याचे प्रतीक आहे. विघ्नांचा हरण करणारा आहे. तसेच तो मंगल कार्याचाही देव आहे. लग्न, मुंज इ. धार्मिक मंगल कार्याच्या पत्रिकेवरही गणपतीचे चित्र असते. त्याचे स्मरण केले जाते. घरे बांधताना पूर्वी एक कोनाडा ठेवून त्यात गणपतीची मूर्ती ठेवीत. असा हा गणपती म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाशी एकरूप झालेला ओंकार. आपल्या चार वेदांपैकी ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद. ब्रह्मणस्पती सूक्त हे गणेशाचे सूक्त आहे. ऋग्वेदातील ब्रह्मणस्पती म्हणजेच गणपती. चारी वेदांनी मिळून ओंकार गणेशाची स्थापना केली. प्रयाग या ठिकाणी ब्रह्मदेवांनी ओंकार गणेशाची आराधना केली. मोठा यज्ञ याग केला. सर्वक्षेत्र निर्विघ्न संपन्न केले. तेच प्रयागक्षेत्र ‘ओंकार गणेश’ क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले.

उत्सवाची प्रथा...
गाणपत्य संप्रदायामध्ये चतुर्थी या तिथीला फार महत्त्व आहे. ही तिथी सर्व तिथींची माता आहे असे म्हटले आहे. ॐकाराने भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी या दिवशी अवतार स्वरूप जन्म घेतले म्हणून या तिथींनी गणेश जयंती म्हणतात. ब्रह्मदेवांनी सर्वात प्रथम पृथ्वी निर्माण करण्याचा संकल्प केला होता. त्या वेळी त्यांनी ओंकाराची प्रार्थना केली. क्षणात त्यांना सर्वत्र माती दिसू लागली. ती माती ब्रह्मदेवांनी ओंजळीत घेतली. त्या वेळी ओंकारांनी मृत्तिकेच्या अंशरूपात घेतलेला तो जन्मच होता. तेव्हा देवांनी त्या मृत्तिकेला ओंकार गणेशाचा आकार दिला. मृत्तिकेपासून म्हणजे मातीपासून ओंकाराची गणेशमूर्ती झाली म्हणून तिला पार्थिव गणपती असे म्हणण्यात येऊ लागले. स्वतः पार्वतीने लेखन पर्वतावर निर्गुण स्वरूप ओंकाराची पार्थिव प्रतिमा करून त्याची आराधना केली. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला ओंकार गणेश प्रकट झाला म्हणून या दिवशी मृत्तिकेच्या गणपतीची म्हणजेच पार्थिव गणेशाची प्रतिष्ठापना करून त्याचा उत्सव करण्याची प्रथा सुरू झाली.

ओंकार गणेशाची साडेतीन पिठे
१) वेदकाळापूर्वी आणि सृष्टीच्या निर्मितीपूर्वी ओंकार गणेशाने हवेच्या पोकळीत स्वानंदासाठी एक स्थान निर्माण करून तेथे प्रथम शुभागमन केले. ते क्षेत्र म्हणजे स्वानंदपूर. पंचदेवांनी ओंकाराची तपश्‍चर्या केली आणि म्हणून या स्वानंदपुरीला आद्यपीठाचे महत्त्व प्राप्त झाले. ओंकाराने कमलासुराचे विच्छेदन केले. त्याची शीर सजीव स्वरूपात यज्ञाजवळ येऊन पडले. ते मृत झालेले नव्हते. त्यामुळे ते अर्धे पीठ ठरले. अशा तऱ्हेने स्वानंदपूर हे गणपती संप्रदायाचे दीड पीठ ठरले. ॐकार या वेळी मयूरावर विराजमान होऊन आलेला होता. म्हणून पंचदेवांनी मोरया नावाने त्यांच्या मूर्तीची तेथे प्रतिष्ठापना केली. तेच हे स्वानंदपूर म्हणजे महाराष्ट्रातील मोरगाव होय.
२) कमलासुराच्या देहाचे ओंकाराने आणखी दोन भाग आकाशात फेकले होते. त्यातील खांद्यापासून बेंबीपर्यंतचा भाग संभाजीनगर जिल्ह्यातील राजूर येथे पडला. परंतु शीर नसल्यामुळे हा धडाचा भाग मृत झाला. म्हणून येथे एक पूर्ण पीठ तयार झाले.
३) कमलासुराच्या शरीराचा तिसरा भाग म्हणजे बेंबी ते पायापर्यंतचा भाग हा जळगाव जिल्ह्यातील पद्मालय येथे पडला. तो भागही मृत झाला आणि म्हणून पद्मालयाला पूर्णपीठाचे महत्त्व प्राप्त झाले. अशी ही साडेतीन पीठे प्रसिद्ध झाली.


ओंकार परब्रह्माचे प्रतीक
ॐकार हा परमात्मा आहे असे समजून ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला ‘ॐ नमोजी आद्या’ असे म्हटले आहे. ओंकाराची प्रथम मात्रा म्हणजे आकार मात्रा. गणपतीचे पाय असून दुसरी उकार मात्रा म्हणजे पोट आहे आणि तिसरी मकार मात्रा म्हणजे गणेशाच्या मस्तकाचा आकार आहे. संत तुकारामांनी त्यांच्या अभंगात ओंकारातील अकार म्हणजे ब्रह्म, उकार म्हणजे विष्णू आणि मकार म्हणजे महेश म्हटले आहे. तिन्ही देव एकत्र म्हणजे ‘गजानन’ म्हटलेले आहे.
ओंकार परब्रह्माचे प्रतीक आहे. ब्रह्मदेवाचा समग्र अर्थ ओंकारात सामावलेला आहे. म्हणून तीन मात्रांनी तो समग्र सृष्टीला सामावून घेतो, तर शेष ठरलेल्या अर्ध्या मात्रेने तो सृष्टीकर्त्याला स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतो. तो प्राण, वेद यांचे तेजःपुंज असे प्रतीक आहे आणि म्हणूनच अशा या ओंकार गणेशाचे स्मरण करून म्हणू या....

ओंकार स्वरूप रूप गणेशाचे ।
ते तिन्ही देवांचे जन्मस्थान ।।
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू,
मकार महेश जाणियेला
ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न,
तो हा गजानन मायबाप
------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com