पुण्यातील मानाचे गणपती

पुण्यातील मानाचे गणपती

Published on

१) मानाचा पहिला गणपती- ग्रामदैवत श्री कसबा गणपती :
श्री कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत. शहाजीराजे भोसले यांनी १६३६ मध्ये पुण्यात लाल महाल बांधला, तेव्हा जिजाबाईंनी या गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली होती. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली, त्या वेळी या गणपतीला प्रथम मान दिला गेला. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९३ मध्ये सुरुवात झाली. कसबा गणपती मंदिर शनिवारवाड्याच्या जवळ असून येथेच मंडळातर्फे दर वर्षी उत्सव साजरा केला जातो. कसबा गणपती मंडळ धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी नावाजलेले आहे. दर वर्षी मंडळातर्फे ७५ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला जातो, तसेच नगर जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी हे दुष्काळी गाव दत्तक घेऊन त्याचा विकास मंडळातर्फे केला जातो.

२) मानाचा दुसरा गणपती- श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ :
१८९३पासून या मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. श्री तांबडी जोगेश्वरी माता ही पुण्याची ग्रामदेवता. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला तेव्हा या मंडळाच्या गणपतीला मानाच्या दुसऱ्या गणपतीचे स्थान देण्यात आले. येथील श्रीगणेशाची उत्सवमूर्ती दर वर्षी शास्त्रशुद्ध पद्धतीने शाडू मातीतून तयार केली जाते. जुन्या काळातील गंजिफाच्या खेळात निरनिराळ्या चित्रांतील हत्तीच्या चित्रणाप्रमाणे, म्हणजेच आफ्रिकन हत्तीच्या चेहऱ्याप्रमाणे पूर्ण चेहरा असलेले मुख, हे या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे. मंडळाच्या शताब्दी वर्षापर्यंत श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक सरदार नातूंकडील पेशवेकालीन वैभव सांगणाऱ्या पालखीतून निघत असे. त्यानंतर चांदीची पालखी तयार करण्यात आली. १८९६पासून उत्सवातील करमणुकीच्या कार्यक्रमांत मेळ्यांचा मोठा सहभाग होता.
३) मानाचा तिसरा गणपती- गुरुजी तालीम गणपती मंडळ :
गुरुजी तालीम ही पुण्यातील जुन्या काळातील सर्वांत मोठी तालीम. १८८७पासून गुरुजी तालीम गणपती उत्सवाची सुरुवात झाली होती. भिकू पांडुरंग शिंदे, नानासाहेब खाजगीवाले, शेख हशम वल्लद लालाभाई व रुस्तुमभाई (नालबंद बंधू) या तालमीच्या गुरुवर्यांनी या मंडळाची स्थापना केली. सुरुवातीस तालमीतच गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होत असे, पण कालांतराने लक्ष्मी रस्ता मोठा झाल्यावर गणपती मंदिरासमोर मांडव टाकून उत्सव साजरा होऊ लागला. पुण्याचा राजा म्हणून या गणपतीची महती आहे. या गणपतीची विसर्जन मिरवणूक फुलांच्या रथातून काढतात.
४) मानाचा चौथा गणपती- श्री तुळशीबाग गणपती मंडळ :
लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या पहिल्या काही लोकांपैकी एक होते तुळशीबागवाले. रामचंद्र तुळशीबागवाले यांनी काही सहकाऱ्यांसह तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळाची स्थापना करून उत्सवाला प्रारंभ केला. त्या वेळी मानाच्या गणपतींचा क्रम ठरवताना तुळशीबागवाले यांच्या गणपतीला चौथे स्थान मिळाले. दातार, कर्वे आणि खटावकर यांनी उत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली. वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक देखावे, हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. दत्तात्रेय खटावकर यांनी मंडळासाठी केलेले अनेक देखावे नावाजले गेले. येथील श्री गणेशाची मूर्ती १३ फूट भव्य उंचीची आहे.

५) मानाचा पाचवा गणपती- केसरीवाडा गणपती मंडळ :
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली, तेव्हापासून म्हणजेच १८९४ पासून केसरी संस्थेच्या गणेशोत्सवालाही प्रारंभ झाला. त्या वेळी लोकमान्य टिळक विंचूरकरांच्या वाड्यात राहत असतं. त्या वाड्यातील पटांगणात मंडप घालून हा उत्सव साजरा होत असे. त्या वेळी टिळक केसरीवाड्यात एखादे व्याख्यान देत आणि इतरत्रही व्याख्यानासाठी जात असत. १९०५ पासून हा उत्सव केसरीवाड्यात होतो. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते.

६) श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट
बुधवार पेठेत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर हे मंदिर आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवासंदर्भात आयोजित केलेल्या पहिल्या बैठकीला दगडूशेठ हलवाई उपस्थित होते. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार १८९३ पासून दगडूशेठ यांचा कोतवाल चावडीचा गणपती सुरू झाला. श्रीमंत दगडूशेठ गणपती हे नाव
त्यानंतर बऱ्याच वर्षांनी रूढ झाले. दगडूशेठ यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने गणपती पेठेतल्या लोकांना दिला. १८९७ पासून ही परंपरा सुरू झाली. पुढे १९५२ मध्ये सुवर्णयुग तरुण मंडळातल्या पंचांनी तो ताब्यात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सवासाठी त्याला आणखी नवे स्वरूप दिले. १९६७ मध्ये अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त श्री गणेशाची मूर्ती बदलण्यात आली. २००३ मध्ये या मंदिराचे विस्तारीकरण झाले.

७) अखिल मंडई मंडळ :
येथील गणेशोत्सवाला १८९३ मध्ये प्रारंभ झाला. १४ सप्टेंबर १८९३ या दिवशी गणेश चतुर्थीला लोकमान्य टिळक यांच्या हस्ते या सार्वजनिक गणपतीची स्थापना झाली. १८९४ मध्ये अखिल मंडई गणेश मंडळ स्थापन झाले. लक्ष्मणराव डोंगरे काची (पैलवान) यांनी पुत्रप्राप्तीसाठी तुळजापूरच्या भवानी मातेला केलेल्या नवसानुसार शारदा गजाननाच्या शिल्पाची प्रतिकृती तयार केली होती. ही मूर्ती बरीच मोठी असल्यामुळे त्यांनी ती तत्कालीन छत्रपती शिवाजी संघ म्हणजेच आताचे अखिल मंडई मंडळ यांना दिली. त्यानंतर हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला. झोपाळ्यावरचा गणपती म्हणून शारदा गजाननाला ओळखतात.

८) श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती मंडळ :
भाऊसाहेब लक्ष्मण जावळे ऊर्फ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ मध्ये या गणपतीची स्थापना केली. शनिवारवाड्याच्या मागच्या बाजूला त्यांचा वाडा होता. त्याच वाड्यात त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. येथील श्रीगणेशाची मूर्ती भाऊसाहेब रंगारी यांनीच स्वतः कागदाच्या लगद्यापासून तयार केली होती. राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या श्रीगणेशाची ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. तीच मूर्ती आणि मिरवणुकीचा तोच सागवानी लाकडी रथ गेली १३२ वर्षे येथील सार्वजनिक गणेशोत्सवात पाहायला मिळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक क्रांतिकारकांची व्याख्याने या गणपतीपुढे होत असत.
..........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com