दोन महिने व्‍हेंटिलेटरवरील सखाराम ठणठणीत

दोन महिने व्‍हेंटिलेटरवरील सखाराम ठणठणीत

Published on

पुणे, ता. ३० : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ गावातील ११ वर्षांच्‍या सखाराम शिरगिरे याच्‍या पायाला छोटा गंजलेला खिळा लागला. किरकोळ दुखापत म्‍हणून त्‍याकडे दुर्लक्ष केले; परंतु त्‍यावाटे धनुर्वात (टिटॅनस) झाला. लहानपणी धनुर्वात किंवा कोणतीच लस न घेतल्‍याने आजार झपाट्याने बळावला. इतका की त्‍याच्‍या मांसपेशी कडक झाल्‍या व श्‍वास घ्यायला त्रास होऊ लागला. ससून रुग्‍णालयातील बालरोग अतिदक्षता विभागातील व्‍हेंटिलेटरवर (पीआयसीयू) सखारामवर तब्‍बल ५७ दिवस उपचार झाले. अखेर तो मृत्‍यूच्‍या दाढेतून परत आला.

दीर्घकाळ ‘पीआयसीयू’मध्‍ये असताना सखारामला न्यूमोनिया झाला आणि त्यावर तातडीने औषधोपचार करावे लागले. तसेच शरीरात प्रथिने व कॅलरींची कमतरता निर्माण झाली. वारंवार मांसपेशी कडक होण्यामुळे (स्पॅझम्स) डॉक्‍टरांना औषधांच्या मात्रेत सतत बदल करावा लागत होता. इतर संसर्गाचाही धोका होता. अखेर या सर्व अडचणींवर मात करत त्याची प्रकृती सुधारली व सुमारे दोन महिन्यांनंतर त्याला व्हेंटिलेटरवरून काढले. १५ दिवस बालरोग विभागाच्या कक्षात व पुढे रुग्णालयातून त्याला घरी सोडण्यात आले. आता तो पूर्वीसारखा ठणठणीत झाला आहे.

आईचे धैर्य, डॉक्टरांचे प्रयत्न
सखारामला वडील नसल्यामुळे त्‍याच्‍या आईने दीर्घकाळ रुग्णालयात राहून त्‍याची काळजी घेतली. तिच्या धैर्याला साथ मिळाली ती बालरोग विभाग व खर्च कमी करण्‍यासाठी वैद्यकीय समाजसेवा विभागाची. बालरोग चिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. आरती किणीकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. उदय राजपूत, डॉ. राहुल दावरे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुविधा सरदार व निवासी डॉक्टरांनी सातत्याने लक्ष ठेवले. पारिचारिका समन्वयक परवीन व प्रतिभा महाजन यांनी आत्‍मीयतेने सेवा दिली. त्‍यांना अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार व वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

ज्‍या गर्भवतींचे लसीकरण होत नाही किंवा ज्‍यांची प्रसूती अस्वच्छ परिस्थितीत होते, त्‍यांच्‍यामध्‍ये हा धोका वाढतो. गर्भवतींना टिटॅनस लस देणे, स्वच्छ वातावरणात प्रसूती करणे अत्यावश्यक आहे. जर गर्भवतींना लस मिळाली नसेल तर जन्मानंतर बाळाला टिटॅनस इम्युनोग्लोब्युलिन देता येते. मात्र, बाळाचे नियमित लसीकरण व जखम-स्वच्छता आणि वेळेवर उपचार केल्‍यास हा धोका टाळता येतो. या लसी सरकारी दवाखान्‍यात प्रत्‍येक बाळाला मोफत दिल्‍‍या जातात.
- डॉ. आरती किणीकर,
विभागप्रमुख, बालरोग चिकित्साशास्त्र

सखारामने कोणतीच लस घेतली नव्‍हती, त्‍याने त्‍याचा हा आजार बळावला. धनुर्वात हा मोठया जखमेतून होतो, असा गैरसमज आहे. तो अगदी छोट्या जखमेतूनही होऊ शकतो. म्हणूनच जखम झाल्यानंतर ती लगेच साबण आणि स्वच्छ पाण्याने नीट धुणे गरजेचे आहे. त्यानंतर वेळ न दवडता डॉक्टरांकडे जावे व त्‍यावर प्रथम धनुर्वाताची (टीटी) लस घ्यावी. इतके दिवस व्‍हेंटिलेटरवर राहून यशस्‍वी उपचार होणे ही बाब दुर्मिळ आहे.
- डॉ. उदय राजपूत,
सहयोगी प्राध्यापक व प्रमुख पीआयसीयू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com