‘जेटस्ट्रीम ॲथेरेक्टोमी’द्वारे रक्तवाहिन्यांमधील अडथळा दूर
पुणे, ता. ३ : मधुमेह असलेल्या ६१ वर्षीय ज्येष्ठ महिलेला पायाचा अल्सर (डायबेटिक फूट अल्सर) झाला होता. त्यांची ही जखम बरी होत नव्हती. त्यामुळे पाय कडक होण्यासोबतच रक्तवाहिनी बंद झाल्याने पायाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे पाय कापण्याची वेळ आली होती. मात्र, रूबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांनी केलेल्या ‘जेटस्ट्रीम ॲथेरेक्टोमी’ प्रक्रियेमुळे पायाचा रक्तस्राव पूर्ववत झाल्याने कापण्यापासून वाचविण्यात आला.
‘जेटस्ट्रीम ॲथेरेक्टोमी’ ही एक आधुनिक वैद्यकीय पद्धत आहे. याद्वारे रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण झालेला अडथळा दूर केला जातो. पायांच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळा दूर करण्यासाठी ती उपयोगी पडते. शहरातील ही पहिलीच प्रक्रिया असल्याचा दावा रूबी हॉल क्लिनिकने केला आहे. कमीत कमी छेद असणाऱ्या ४५ मिनिटांच्या प्रक्रियेमुळे रुग्णाच्या पायातील रक्तस्राव पूर्ववत करण्यात डॉक्टरांना यश आले.
रुग्णालयात दाखल होताना रुग्णाला वेदना होत होत्या. ‘जेटस्ट्रीम ॲथेरेक्टोमी’ या उपकरणामुळे कॅल्शिअममुळे निर्माण झालेला अडथळा तोडता येणे शक्य होते. ही प्रक्रिया रूबी हॉल क्लिनिकमधील ‘बाय-प्लेन कॅथलॅब’ येथे नुकतीच झाली. त्यानंतर लगेचच रुग्णाला आराम मिळाला. त्यांच्या पायातील वेदनाही कमी झाल्या आणि रक्तप्रवाह पुन्हा सुरू झाला. यामुळे अल्सर बरा होण्याची प्रक्रिया सुरू झाली, अशी माहिती रूबी हॉल क्लिनिकचे प्रमुख इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. यादव मुंडे यांनी सांगितले. ते म्हणाले की, कॅल्शिअममुळे रक्तवाहिनी खूप कडक झाली होती. अशा परिस्थितीत सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या ‘बलून’ किंवा ‘स्टेंट’ने धमनी खुली करता येणे कठीण होते. ‘जेटस्ट्रीम ॲथेरेक्टोमी’ उपकरणाच्या मदतीने आम्ही हे कडक झालेला अडथळा सुरक्षितपणे तोडला.