गणेशोत्सवात अर्थचक्राला नवी गती

गणेशोत्सवात अर्थचक्राला नवी गती

Published on

पुणे, ता. ५ : गणेशोत्सवाचा काळ म्हणजे आनंदपर्वाचा काळ. गणरायाचा हा उत्सव वातावरणात मांगल्य निर्माण करतोच; मात्र बाजारपेठेतही चैतन्य निर्माण करतो. वर्षभरात सर्वाधिक उलाढाल होत असल्याचा हा काळ. अगदी किरकोळ वस्तूंच्या विक्रीपासून ते सजावट, पूजेच्या वस्तूंपर्यंतच्या खरेदीतून अर्थचक्राला गती मिळते. यंदाचा उत्सवही त्याला अपवाद नाही. पुणेकरांनी मोठ्या उत्साहात यंदाचा गणेशोत्सव साजरा केल्याने खाद्यपदार्थ, फुलबाजार अशा अनेक क्षेत्रात मोठी उलाढाल पाहायला मिळाली आहे. या उलाढालीचा घेतलेला आढावा.

साडेसात लाख उकडीच्या मोदकांची विक्री
गणेशोत्सव आणि मोदक, हे एक अतूट समीकरण. गणेशोत्सवाच्या काळात गणरायाला नैवेद्य दाखवण्यासाठी उकडीच्या मोदकांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. दरवर्षी या मागणीत वाढच होत आहे. यंदा गणेशोत्सवात आत्तापर्यंत तब्बल साडेसात लाख उकडीच्या मोदकांची विक्री झाली आहे; तर तळणीच्या मोदकांची जवळपास ५० हजार किलोपर्यंत विक्री झाल्याची माहिती पुणे केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी दिली.
यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी साडेचार लाख हातवळणीच्या उकडीच्या मोदकांची विक्री झाली. एका मोदकाची किंमत ३५ ते ४५ रुपयांपर्यंत होती. नारळाचे दर वाढल्याचा परिणाम मोदकांवर झाला. संपूर्ण पुणे जिल्ह्यातील मोदकांच्या विक्रीतून सुमारे तीन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. ‘‘मोदकांचे उत्पादन करणाऱ्यांची संख्या वाढली असून शहरात जवळपास अडीच हजारांहून अधिक घरगुती महिला उत्पादक तयार झाल्या आहेत. तसेच, पॅकेजिंग आणि वितरणासाठी उत्तम सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मोदक विक्रीत दरवर्षी वाढ होत आहे’’, असे निरीक्षण सरपोतदार यांनी नोंदवले.

मिठाईच्या मोदकांना वाढती मागणी
मावा मोदक, आंबा मोदक, खव्याचे मोदक, चॉकलेट अशा मोदकांच्या विविध प्रकारांनाही दरवर्षी मागणी वाढते आहे. त्यामुळे यंदाही गतवर्षीपेक्षा २० ते २५ टक्के अधिक विक्री झाली असल्याचे ‘काका हलवाई’चे भागीदार अनिल गाडवे आणि अमित गाडवे यांनी सांगितले. नव्या प्रकारच्या मोदकांनाही ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र एकूण उलाढालीची नेमकी आकडेवारी गणेशोत्सव संपल्यानंतर दोन दिवसांनी जाहीर केली जाणार आहे.

नारळांच्या बाजारपेठेत १० कोटींची उलाढाल
गणेशोत्सवात सुमारे १४ ते १५ लाख नारळांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. या माध्यमातून बाजारात ८ ते १० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गेल्यावर्षी साधारण ३० रुपयांना मिळणारे नारळ यंदा ६० रुपयांना मिळत होते. भाव दुप्पट झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा उलाढाल वाढली असल्याचे निरीक्षण ज्येष्ठ व्यापारी दीपक बोरा यांनी नोंदवले. गणरायाचा आवडता नैवेद्य असणाऱ्या मोदकासाठी नारळांची सर्वाधिक विक्री होते. गौरींच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थांमध्ये नारळाचा उपयोग केला जातो. तसेच, या काळात उपहारगृहांचाही मोठ्या प्रमाणावर व्यवसाय होता. त्यांनाही विविध पदार्थांसाठी नारळाची गरज असल्याने दहाही दिवस नारळ विक्री मोठ्या संख्येने झाली.

फुलांची ५०० टन आवक
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांचे भाव घटले होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत मार्केट यार्डातील फुलबाजारातील उलाढाल घटली आहे. गेल्या वर्षी १२ ते १३ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यंदा ती ७ ते ८ कोटी रुपये झाली असल्याचा अंदाज फूलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी सांगितले. गौरी-गणपतीच्या काळात सजावटीसाठी झेंडू, जर्बेरा, डच गुलाब, शेवंती, चमेली, जुई यांसह विविध फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी होती. फुलांची आवक सोलापूर, सातारा तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्यातून होते. यंदा गणेशोत्सवात विविध प्रकारच्या ४५० ते ५०० टन फुलांची आवक झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

कलाकारांना मिळाले काम
गणेशोत्सवात ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही अनेक सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये तसेच सोसायट्यांमध्ये गायन मैफील, नृत्य, एकपात्री नाट्यप्रयोग, एकांकिका, नाटक, जादूचे प्रयोग, पपेट शो असे विविधरंगी कार्यक्रम
झाले. त्यामुळे बहुतांश कलाकारांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले, तसेच आर्थिक कमाई देखील झाली. एका कार्यक्रमासाठी चार-पाच हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत मानधन घेतले जात होते.
गणेश मंडळांच्या देखाव्यांमध्ये जिवंत देखाव्यांचे मोठे आकर्षण असते. यंदा तर ऐतिहासिक आणि पौराणिक देखाव्यांवर आधारित अनेक जिवंत देखावे लोकप्रिय झाले होते. या जिवंत देखाव्यांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना उत्सवाच्या निमित्ताने रोजगार मिळाला. यात एरवी अन्य काम करणारे; मात्र उत्सवाच्या काळात जिवंत देखाव्यात काम करणाऱ्या हौशी कलाकारांचाही समावेश होता.

Marathi News Esakal
www.esakal.com