मानाच्या गणपतींचे आठ तासांत विसर्जन

मानाच्या गणपतींचे आठ तासांत विसर्जन

Published on

पुणे, ता. ७ : ‘‘पुण्यातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक आम्ही वेळेतच संपविणार’ असा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिलेला विश्वास खरा ठरविला. सनई चौघडा, नगारावादनाचा मंगलमय सूर...भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या ढोल-ताशांचा गजर... फुलांची मुक्त उधळण...‘मोरयाऽऽ...मोरयाऽऽ’, ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष... अन्‌ दर्शनासाठी जोडले जाणारे लाखो हात अशा पारंपारिक पद्धतीने अन्‌ तेवढ्याच शिस्तबद्धपणे पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक यंदा अवघ्या आठ तास नऊ मिनिटांत आटोपली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दीड तास अगोदर भाविकांच्या अलोट गर्दीने, वरुणराजाच्या साक्षीने मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक संपली.
पुण्यातील वैभवशाली परंपरेचा वारसा जपणाऱ्या मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता महात्मा फुले मंडईतून सुरूवात झाली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. सकाळी साडेनऊ वाजता मानाचा पहिला कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक मंडईतून लक्ष्मी रस्त्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्या पाठोपाठ पाचही गणपतींची मिरवणूक मुख्य मार्गावर आली.

गेल्या काही वर्षांपासून मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक लवकर आटोपण्याचा प्रयत्न मंडळांमार्फत होत असून या प्रयत्नांना यशही येत आहे. गेल्या काही वर्षांत ११ तासांवरून यंदा अवघ्या आठ तासांत गणरायाची विसर्जन मिरवणूक आटोपण्याचा दिलेला शब्द गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पाळला. मानाच्या गणपतींची मुख्य विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न २०२२ पासून करण्यात येत आहे. याआधी अकरा, दहा किंवा नऊ तासांत ही मिरवणूक संपत होती. यंदा ही मुख्य मिरवणूक अवघ्या आठ तासांत संपविण्यात आली. मुळात विसर्जन मिरवणुकीतील शेवटचा टप्पा असणाऱ्या टिळक चौकात मानाचा पहिला कसबा गणपतीची मिरवणूक गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अर्धा तास अगोदर पोचली. टिळक चौकात कसबा गणपतीचे चांदीच्या पालखीतून दुपारी अडीच वाजता आगमन झाले. लाखो भाविकांनी ‘मोरयाऽऽ....मोरयाऽऽ’ असा जयघोष करत गणरायाच्या दर्शनासाठी हात जोडले.

कसबा गणपतीपाठोपाठ मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या आकर्षक पालखीत विराजमान झालेल्या गणरायाचे दुपारी पावणेतीनच्या सुमारास टिळक चौकात आगमन झाले. ढोल-ताशा पथकांचे दमदार वादन... अन्‌ त्याला भाविकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद... अन्‌ होणारा जल्लोष याने संपूर्ण वातावरण दणाणून सोडले. त्यानंतर तब्बल एक तासांनी मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाच्या गणरायाचे टिळक चौकात आगमन झाले. गुलालाची मुक्त उधळण करत.... वातावरणात उत्साह पेरणाऱ्या सादरीकरणाने भाविकांची उत्सुकता शिगेला पोचवली. त्यानंतर मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपती मंडळाच्या गणरायाचा रथ टिळक चौकात सायंकाळी चार वाजून २७ मिनिटांनी, तर मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपती मंडळाच्या गणरायाची पालखी टिळक चौकात सायंकाळी पाच वाजून १६ मिनिटांनी आली.

विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांमध्ये अंतर पडू नये, म्हणून गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, पोलिस वारंवार सूचना देत होते. दरम्यान मानाच्या पाच गणपती मंडळांना मंडई, बेलबाग चौक ते टिळक चौक हे दीड ते दोन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी अवघे आठ तास नऊ मिनिटे लागली. गेल्यावर्षी मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक संपायला तब्बल नऊ तास ३८ मिनिटे लागली होती. यंदा ही मिरवणूक जवळपास दीड तास अगोदरच संपली.

ढोल-ताशा पथकांचे मंत्रमुग्ध वादन
मंडईपासून ते टिळक चौकापर्यंत अशा जवळपास ११ चौकांमध्ये राष्ट्रीय कला अकादमीच्या कलाकारांनी सकाळी सहा वाजल्यापासूनच रांगोळी काढण्यास सुरुवात केली. मानाच्या गणपतींची मिरवणूक पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह विविध राज्यांतून भाविक आले होते. लक्ष्मी रस्त्यात ठिकठिकाणी भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी आणि पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती. ढोल-ताशा पथकांचे मंत्रमुग्ध करणारे वादन.... विविध पथकांच्या दमदार सादरीकरणाला चौका-चौकात भाविकांनी हात उंचावत आणि टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

मानाच्या गणपतींच्या विसर्जन वेळा
मानाचे गणपती : २०२२ : २०२३ : २०२४ : २०२५
१) कसबा गणपती : दुपारी ४.१५ : दुपारी ४.३७ : दुपारी ४.३५ : दुपारी ३.४५
२) श्री तांबडी जोगेश्वरी : सायंकाळी ५.३७ : सायंकाळी ५.११ : सायंकाळी ५.१० : सायंकाळी ४.१०
३) गुरुजी तालीम मंडळ : सायंकाळी ७.२७ : सायंकाळी ५.५४ : सायंकाळी ६.४५ : सायंकाळी ४.२५
४) तुळशीबाग गणपती : रात्री ८.०१ : सायंकाळी ६.३२ : सायंकाळी ७.१४ : सायंकाळी ४.५५
५) केसरीवाडा गणपती : रात्री ८.४५ : सायंकाळी ६.५९ : सायंकाळी ७.३८ : सायंकाळी ५.३९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com