मध्यरात्रीही गर्दीने फुलले मुख्य रस्ते
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवड, शहरालगतच्या उपनगरांसह गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने आले होते. शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास देखील जुना पुणे-मुंबई महामार्ग, औंधमधील राजभवन रस्ता, गणेशखिंड रस्ता, कर्वे रस्ता, नगर रस्ता, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता, सातारा रस्त्यासह विविध रस्त्यांवर मध्यरात्रीच्या सुमारास वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. मोटारींबरोबरच नागरिकांनी पार्किंगच्या समस्या टाळण्यासाठी दुचाकीवरून शहराच्या मध्यवर्ती भागात जाण्यास पसंती दिली. त्यामुळे शहरात येणाऱ्या बहुतांश मुख्य रस्त्यांवर गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली.
ट्रॅक्टरच्या बॉनटवर नृत्य
गणेशोत्सव मंडळांचे विविध कलाकृतींनी सजलेले रथ विसर्जन मार्गावर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरवर तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बहुतांश ट्रॅक्टरच्या इंजिनवरील भागावर तरुणांना थांबण्यासाठी खास लोखंडी सांगाडा तयार करण्यात आला होता. त्यावर मंडळाच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या कुटुंबीयांतील तरुणी, लहान मुले थांबलेली होती. ध्वनिवर्धकाच्या तालावर तरुण-तरुणींसह लहान मुले देखील नृत्याचा आनंद लुटत होती.
विद्यार्थी, तरुणांचा मनसोक्त आनंद
विविध गणेशोत्सव मंडळांच्या ध्वनीवर्धकासमोर मंडळाचे कार्यकर्ते, त्यांचे मित्रमंडळी व कुटुंबीय नाचण्याचा आनंद लुटत होते. त्याचवेळी शहराच्या विविध भागातील महाविद्यालये, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समूह, ढोल-ताशा पथकांमधील तरुणांचे समूह कोणत्याही मंडळाच्या ध्वनीवर्धकासमोर मनमुरादपणे नृत्य करण्याचा आनंद घेत होती. अनेक आयटी कंपन्या, खासगी क्षेत्रातील नोकरदार तरुणांचे समूह, ग्रामीण भागातून आलेले तरुणांचे समूह विविध ठिकाणच्या गणेशोत्सव मंडळांसमोर नृत्यात सहभागी होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.
पथकांचा उलट्या दिशेने प्रवास सुरूच
ढोल-ताशा पथकांनी विसर्जन मिरवणुकीतील अडथळे टाळण्यासाठी मिरवणूक संपल्यानंतर ढोल खांद्यावर घेऊन उलट्या दिशेने येऊ नये, असे आवाहन पोलिसांनी ढोल-ताशा पथकांना केले होते. ढोल-ताशा पथकांनी दिवसभरात संबंधित सूचनेचे पालन केले, सायंकाळनंतर मात्र पथकातील तरुण आपल्या खांद्यावर ढोल घेऊन लक्ष्मी रस्त्यासह विविध प्रमुख रस्त्यांवरून जात होते. त्यामुळे अगोदरच गर्दी झालेल्या रस्त्यांवर संबंधित प्रकारामुळे आणखी ताण येत होता. काही वादकांसमवेत नागरिकांचे वादही झाले होते.
पाण्याच्या बाटल्या रस्त्यावर
नागरिकांकडून पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याच्या बाटल्या घेतल्या जात होत्या. पाणी पिल्यानंतर रिकामी झालेली पाण्याची बाटली नागरिकांकडून रस्ते, पदपथ, दुभाजक, मुख्य रस्त्यांवरील चौक, झाडांभोवती सर्रासपणे टाकल्या जात होत्या. उपनगर, ग्रामीण भागातील नागरिकांकडूनच नव्हे, तर शहरातील नागरिकांकडूनही स्वच्छतेला फाटा दिला जात होता. दरम्यान, काही महिला व पुरुष पाठीवर प्लॅस्टिकची मोठी पिशवी घेऊन नागरिकांनी टाकलेल्या पाण्याच्या बाटल्या तत्काळ उचलून परिसर स्वच्छ करत होते. संबंधित नागरिक रिकाम्या बाटल्या उचलतानाचे चित्र पाहून काही सुजाण नागरिकांनी आपल्याकडील बाटल्या कचरापेटीत टाकल्याचे समाधानकारक चित्रही मिरवणूक मार्गावर दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.