आपुलकीची विचारपूस वाचवू शकते एखादा जीव
पुणे, ता. ९ : ‘आत्महत्या प्रतिबंध हा केवळ तज्ज्ञांचा विषय नसून आपण सर्वजण मदत करू शकतो. आपल्या मित्र-परिवारांची आवर्जून विचारपूस करा. आपले मत न लादता त्यांना समजून घ्या. त्या व्यक्तीने काय अनुभवले आहे ते शांतपणे ऐकणे हे सर्वात मोठे समजून घेण्याचे माध्यम आहे. त्यांना मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक, डॉक्टर यांच्याकडे जाण्यासाठी सोबत द्या. ‘तू ठीक आहेस ना’ हा छोटा प्रश्नही एखाद्याचा प्राण वाचवू शकतो. म्हणून एखाद्या व्यक्तीला एकटं वाटू न देता सतत संवाद व संपर्क ठेवा,’ आत्महत्या रोखण्यासाठी असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ सर्वांना देतात.
दरवर्षी १० सप्टेंबरला ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध’ दिन साजरा केला जातो. हा दिवस सामाजिक जबाबदारी, जनजागृती आणि कृतीचे आवाहन करतो. आत्महत्येचे विचार करणाऱ्याची इच्छा मृत्यूला कवटाळायची असेलच असे नाही. खरंतर त्याला भावनिक, शारीरिक वेदनेपासून तत्काळ सुटका हवी असते. काहीही सुधारू शकत नाही, भविष्यातही काहीच बदलणार नाही असे वाटून परिणामी त्या व्यक्तीला त्याच्या क्षमतेवर विश्वास राहत नाही. जेव्हा मानसिक वेदना असह्य होते आणि त्यात लाज, अपराधीपणा, अपमान, एकटेपणा किंवा भीती यासारख्या भावना मिसळतात तेव्हा व्यक्ती आत्महत्येकडे झुकते, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मनजित संत्रे यांनी सांगितले.
आत्महत्येचा प्रयत्न आता गुन्हा नव्हे
भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा नाही. मात्र शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याला काम करण्यापासून अडवण्यासाठी आत्मदहन किंवा आत्महत्येचा प्रयत्न हा शिक्षेस पात्र ठरू शकतो.
आत्महत्येची लक्षणे
- सतत निराशा किंवा जगण्याची इच्छा नसणे
- अचानक मूडमध्ये बदल होणे, उदासीनतेनंतर एकदम शांत होणे
- धोकादायक किंवा बेफिकीर वागणूक
आत्महत्येची आकडेवारी काय सांगते?
- जगातील आत्महत्यांपैकी सुमारे ७३ टक्के घटना कमी व मध्यम उत्पन्न देशांत होतात
- एकूण मृत्यूंपैकी एक टक्का मृत्यू आत्महत्येमुळे
- भारतात २०२२ मध्ये सुमारे १.७१ लाख लोकांची आत्महत्या
- किशोरवयीन मुला-मुलींमधील कारणांमध्ये इंटरनेटवर आधारित खेळांचा वारंवार आणि दीर्घकाळ वापर हा आहे
- चुकीच्या आहार सवयी आणि शरीर प्रतिमेबाबत असमाधान हे नैराश्य व आत्महत्येसाठी जोखीम घटक आहे
- मुलांच्या तुलनेत मुली आत्महत्येचा प्रयत्न ३ पट जास्त करतात
आत्महत्येचा विचार टाळण्यासाठी येथे करा
- राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन (१८०-१२१-३६६७) ही २४ तास उपलब्ध
- ‘टेलिमानस’द्वारे देशभरात मानसिक आरोग्य साहाय्य व समुपदेशन
- ‘टेलिमानस’ सेवेसाठी १४४१६ किंवा १-८००-९१-४४१६ हे टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक
- मुक्ता हेल्पलाइन, कनेक्टिंग एनजीओ
‘वायसीएम’मध्ये गेल्या वर्षात ४०० जणांनी आत्महत्येचे प्रयत्न केला. त्यापैकी १८९ पुरुष, तर २११ स्त्रिया होत्या. स्त्रियांमध्ये प्रामुख्याने गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील होत्या. पती व सासरच्या लोकांसोबत वैयक्तिक तणाव ही स्त्रियांमध्ये, तर पुरुषांमध्ये आर्थिक अडचण, मद्यप्राशन ही कारणे अधिक होते. सर्वाधिक प्रकरणे २० ते ४० वयोगटातील होते.
- डॉ. विलास वाघधरे, मानसोपचारतज्ज्ञ, वायसीएम रुग्णालय, पिंपरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.