फुले स्मारकाच्या भूसंपादन मोबदला धोरणास मान्यता
पुणे, ता. ९ ः क्रांतिसूर्य महात्मा फुले स्मारक आणि सावित्रीबाई फुले स्मारकाचे एकत्रीकरण आणि विस्तारीकरणासाठी भूसंपादन करताना जागा मालकांना व भाडेकरूंना देण्यात येणाऱ्या मोबदल्याचे धोरण महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे या स्मारकाच्या कामाला गती येण्याची शक्यता आहे.
महात्मा फुले स्मारक आणि सावित्री फुले स्मारक यांचे एकत्रीकरण करण्यात यावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत; पण गेल्या वर्षभरापासून त्याबाबत राज्य सरकारतर्फे पाठपुरावा केला जात आहे. या भूसंपादन करण्यासाठी जागेचे आरक्षणही बदलण्यात आले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया महापालिकेकडून वेगात होत नसल्याने यावर राज्य सरकारने नाराजी व्यक्त केली होती. यासाठी विशेष अधिकारी म्हणून उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त केला होता. त्यामुळे घरमालक, भाडेकरूंचे सर्वेक्षण पूर्ण करणे, त्यांना मोबदला कसा हवा आहे, याची माहिती संकलित करणे आदी कामे पूर्ण झाली आहेत. त्यानुसार हा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर झाला आहे.
सव्वा एकर जागा ताब्यात
या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी एकूण ५ हजार ३१० चौरस मीटर (सव्वा एकर) जागा ताब्यात घेतली जाणार असून, यासाठी ४५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
मालकांचा मोबदला
जागा मालकांना रेडीरेकनर दराच्या दुप्पट किंमत अधिक बांधकाम खर्चाचा घसारा वजा करून उर्वरित दुप्पट रक्कम अशा स्वरूपात मोबदला मिळणार आहे. रोख मोबदल्यावर आयकर आकारला गेल्यास तो खर्चही महापालिकेकडून दिला जाणार आहे. मालकांना हवे असल्यास ठरावीक दराच्या महापालिकेच्या सदनिकादेखील दिल्या जातील.
भाडेकरूंची सोय
भाडेकरूंना महापालिकेच्या ताब्यातील निवासी सदनिका दरमहा ६०० ते १ हजार रुपये भाड्याने उपलब्ध करून दिल्या जातील.
बाधितांची संख्या
स्मारक विस्तारीकरणामुळे एकूण ५९२ जागामालक व ३२६ भाडेकरू बाधित होत असून, ही घरे साधारण ५० ते ६० वर्षे जुनी आहेत.
पुढील प्रक्रिया
महापालिका लवकरच बाधितांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन मोबदला व पुनर्वसनाची माहिती देणार आहे. त्यानंतर जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.