हातभट्टी दारू अड्ड्यावर तुळापूर परिसरात छापा
पुणे, ता. ११ : इंद्रायणी नदीकिनारी तुळापूर गावच्या हद्दीत लोणीकंद पोलिसांनी छापा टाकून १० लाख १५ हजार रुपये किमतीचा गावठी हातभट्टीचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
शिवले वस्ती परिसरात गावठी हातभट्टी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार, पोलिस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे यांच्या तपासपथकाने ही कारवाई केली. लोणीकंद पोलिसांनी बुधवारी (ता. १०) रात्री साडेअकरा वाजता छापा टाकला. त्या वेळी सचिन संभाजी राखपसरे (वय ३०, रा. लोहगाव) व प्रदीपकुमार हरिलाल निषाद (वय ३०, रा. लोहगाव) हे दोघेही नदीकिनारी मोकळ्या जागेत गावठी दारू तयार करताना आढळून आले. या कारवाईत चार लोखंडी टाक्यांमधील १२ हजार लिटर दारू तयार करण्याचे रसायन, १६ प्लॅस्टिक कॅनमधील तयार दारू, ७० ढेपा गूळ व टेम्पो असा सुमारे १० लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, तसेच याविरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.