संभाजी ब्रिगेडतर्फे रविवारी ‘महाराष्ट्र धर्मासाठी’ कार्यक्रम
पुणे, ता. ११ ः संभाजी ब्रिगेडतर्फे सामाजिक प्रबोधन कार्यक्रमांतर्गत ‘महाराष्ट्र धर्मासाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. १४) सायंकाळी ४.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमात शालेय शिक्षण अभ्यास व कृती सन्मान समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार, ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक श्रीराम पवार, लेखक व इतिहास-राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. प्रकाश पवार, काँग्रेसचे नेते हनुमंत पवार, बालाजी गाडे-पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार आणि सत्यशोधक शेतकरी सभेचे संघटक किशोर ढमाले यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे.
या कार्यक्रमामागील उद्देश सांगताना गायकवाड म्हणाले, ‘‘महाराष्ट्र धर्म म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीत निर्माण झालेली एक विचारधारा आहे. मानवता, भक्ती, स्वाभिमान, स्वातंत्र्य, सत्य, समता, बंधुत्व, न्याय अशा मूल्यांवर ती आधारित आहे. आज जागोजागी द्वेष पेरला जात असताना हा महाराष्ट्र धर्म लोकांना समजावून सांगण्यासाठी आम्ही सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात घेणार आहोत.’’
‘सरकारने आरक्षणामागील सत्यता सांगावी’
‘‘मराठा आरक्षणाबाबत नुकताच निघालेला शासन निर्णय न्यायालयात टिकेल की नाही आणि वर्षभरात त्यातून किती लोकांना फायदा होईल, हे पाहावे लागेल. मात्र, सरकारने आरक्षणाच्या मर्यादा समाजाला स्पष्टपणे सांगायला हव्यात. शिक्षण माफक दरात मिळावे आणि सरकारी नोकरी मिळावी, हेच आरक्षणाच्या मागणीचे बहुतांश वेळा मूळ असते. त्यामुळे परवडणाऱ्या दरात सर्वांना शिक्षण उपलब्ध करून देणे आणि नोकरभरती करणे, हाच यावरील उपाय आहे’’, असे मत प्रवीण गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले.