नियमबाह्य शैक्षणिक प्रवेशांवर करडी नजर
पुणे, ता. ११ : प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत नियमित फेऱ्या संपल्यानंतर, महाविद्यालयांमधील रिक्त जागांसाठी आणि व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी नियम डावलून प्रवेश प्रक्रिया झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. संस्था स्तरावरील प्रवेश पारदर्शकतेने आणि गुणवत्तेनुसार व्हावेत, यासाठी अखेर तंत्र शिक्षण विभागाने ठोस पावले उचलली आहेत. तंत्र शिक्षण विभागाने संबंधित महाविद्यालयांवर निरीक्षक नेमले आहेत. संबंधित महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेचा अहवाल हे निरीक्षक, तंत्र शिक्षण विभागासमोर सादर करतील. प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थी आणि पालकांवर अन्याय झाल्यास त्यांनी निरीक्षकांना माहिती द्यावी, असे आवाहन तंत्र शिक्षण विभागाने केले आहे.
युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी पुराव्यानिशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाला दिली आहे. अखेर त्यानंतर जाग आलेल्या तंत्र शिक्षण विभागाने संस्था स्तरावर होणारी प्रवेश प्रक्रिया पारदर्शकरीत्या होण्यासाठी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी अशा नियमबाह्य प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर निरीक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे विभाग आणि नागपूर विभागातील महाविद्यालयाचा यात समावेश आहे. याबाबत तंत्र शिक्षण पुणे विभागाचे प्रभारी सहसंचालक मारुती जाधव यांनी परिपत्रक प्रसिद्ध करत प्रवेश प्रक्रियेचा अहवाल आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयाकडे देण्याचे आदेश दिले आहेत.
अशी आहे स्थिती
- महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते
- या अंतर्गत अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून प्रवेशाच्या चार फेऱ्या पूर्ण
- आता ‘कॅप’अंतर्गत रिक्त जागा आणि व्यवस्थापन कोट्यातील जागांवरील प्रवेश हे माहिती पुस्तिकेतील प्रवेश प्रक्रियेच्या नियम क्रमांक १३ नुसार गुणवत्तेप्रमाणे राबविणे अनिवार्य
- मात्र, महाविद्यालय प्रशासन प्रवेशाचे नियम पायदळी तुडवत मोठ्या प्रमाणात पैसे आकारत धनाढ्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे प्रवेश करत आहे
- याबाबत विद्यार्थी आणि पालकांकडून संबंधित महाविद्यालयांच्या विरोधात तक्रारी
सविस्तर अहवाल देण्याचा आदेश
अभियांत्रिकी पदवी (बी.ई/बी.टेक) अभ्यासक्रमासाठी १५ सप्टेंबरपर्यंत संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने प्रसिद्ध केलेल्या माहिती पुस्तकातील नियम क्रमांक १३ नुसार संस्था स्तरावरील प्रवेश पारदर्शकतेने आणि गुणवत्तेनुसार देण्यात येतात किंवा कसे, याबाबत निरीक्षण करण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. निरीक्षकांनी संबंधित संस्थेत प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रत्यक्ष उपस्थित राहून निरीक्षण करावे आणि सविस्तर अहवाल १६ सप्टेंबरपर्यंत तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयास सादर करावा, असा आदेश तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयाने दिला आहे.
निरीक्षक नियुक्ती पुण्यातील महाविद्यालये
- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
- जेएसपीएम राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ताथवडे)
- गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (बाणेर-बालेवाडी)
- एमआयटी ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग (आळंदी),
- जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड मॅनेजमेंट (वाघोली)
- मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (कर्वेनगर)
- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
- सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (वडगाव बुद्रुक)
- सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी श्री काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (वडगाव)
- इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड मॅनेजमेंट
- मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (लोहगाव)
- डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पिंपरी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.