पुण्यात खड्ड्यांचा ‘जिवंत देखावा’
पुणे, ता. ५ ः गणेशोत्सव तोंडावर आला आहे. गणेश मंडळांनी मांडव उभारणीचे काम सुरू केले आहे. पण अजूनही पुणे महापालिका प्रशासनाला शहरातील रस्ते दुरुस्त करणे, खड्डे बुजविणे, पादचारी मार्ग दुरुस्त करण्याच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव तरी पुणेकरांसाठी सुखकर जाणार, की खड्ड्यांमध्ये अन् खराब पादचारी मार्गांवर चालण्याचा ‘जिवंत देखावा’ अनुभवावा लागणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पुण्यातील गणेशोत्सवाची सुरुवात २७ ऑगस्टपासून होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागांसह उपनगरांमधील गणेश मंडळांनी मांडव उभारणी, देखावे तयार करणे याची तयारी सुरू केली आहे. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी दहा दिवस हजारोंच्या संख्येने भाविक शहरात येतात. मध्यवर्ती भागातील सर्व रस्ते गर्दीने तुडुंब भरून वाहत असतात. गणेशोत्सवाच्या काळात गर्दीमुळे वाहतुकीसाठी अनेक रस्ते बंद असतात, त्यामुळे चालत फिरणाऱ्यांची संख्या मोठी असते. अशा वेळी नागरिकांना चांगले रस्ते असल्यास निर्विघ्नपणे गणेशोत्सवाचा आनंद घेता येतो.
‘सकाळ’ने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळ कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्त केले पाहिजेत. रस्ते खाली-वर असल्याने नागरिकांना चालताना अडथळा निर्माण होतो. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुळे अशा ठिकाणी अडखळून पडतात. त्यामुळे महापालिकेने चांगल्या पद्धतीने रस्ते डांबरीकरण करणे आवश्यक आहे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली होती. गणेशोत्सव अवघ्या २० दिवसांवर आलेला असताना अजूनही रस्ते दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही. काही ठिकाणी रस्त्यांवर डांबरीकरण केले आहे, पण आधीच चांगल्या असलेल्या रस्त्यांवरही डांबर टाकले आहे, त्यामुळे कामाचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चांगल्या रस्त्यांवर केले डांबरीकरण
केळकर रस्ता चांगला आहे, असे खुद्द पथ विभागाचे प्रमुख पावसकर सांगत आहेत. पण टिळक वाड्याच्या समोर सुमारे ५० फूट रस्त्यावर गरज नसताना रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे. शिवाय त्याचे कामही अर्धवट केले असून, खडीची दबाई व्यवस्थित केली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत या ठिकाणी खड्डे पडणे, खडी निघणे असा प्रकार होण्याची शक्यता आहे. हे पॅचवर्क केल्याने दुचाकीस्वारांच्या कंबरेला झटके बसत आहेत.
घाण पाणी उडते अंगावर
पादचारी मार्गावर पेव्हिंगच्या खालची बारीक खडी निघून गेल्याने ब्लॉक खिळखिळे होतात. पाऊस पडल्यानंतर या ब्लॉकच्या खाली पाणी साचते व चालताना ब्कॉकवर दबाव पडल्यानंतर पाणी पायावर उडून कपडे घाण होण्याचे प्रकार पुणेकर वारंवार अनुभवत आहेत. महापालिका रस्ते आणि पादचारी मार्गाच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांची निविदा दरवर्षी काढते, मग कामे का होत नाहीत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
मध्यवर्ती भागांतील प्रमुख आठ रस्ते चांगल्या स्थितीत आहेत. पेठांमधील लहान रस्त्यांवरील चेंबर उचलून घेणे, खड्डे बुजविणे, रस्ते दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील १५ दिवसांत ही कामे पूर्ण केली जातील. नागरिकांना चांगल्या सुविधा दिल्या जातील.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग
प्रशासनाचे आदेश
- केळकर, कुमठेकर, लक्ष्मी, शिवाजी, बाजीराव, नेहरू, टिळक आणि शास्त्री रस्त्यांची पाहणी व दुरुस्ती
- खड्डे बुजविणे, पॅचवर्क करणे, ड्रेनेज झाकणे सुधारणे आणि धोकादायक झाडांच्या फांद्या काढण्याचे निर्देश
- रोज रस्त्यांची पाहणी करण्याच्या सूचना पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिल्या
- गणेश मंडळांची मागणी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार म्हणून दुरुस्तीला प्राधान्य