दुर्मिळ युद्ध छायाचित्रांचे प्रदर्शन
पुणे, ता. २५ : ‘वलर सागा ऑफ द इंडियन आर्म्ड फोर्सेस’ या दुर्मिळ आणि ऐतिहासिक छायाचित्र प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. भारतीय सैन्याचा वारसा जतन करण्याचे काम करणारी संस्था ‘समर्पित ऑलिव्ह ग्रीन व्हेंचर्स फाउंडेशन’ (माजी सैनिकांनी स्थापन केलेली संस्था)च्या सहकार्याने कॅम्प येथील सरदार दस्तूर होशांग बॉईज हायस्कूलतर्फे ते भरविण्यात आले होते.
शाळेचे माजी विद्यार्थी व लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुरझोरजी तारापोर यांचे अतुलनीय धैर्य, अढळ आत्मविश्वास, कर्तव्यनिष्ठेबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च सैनिक सन्मान बहाल करण्यात आला. त्यांचे नाव भारताच्या महान योद्ध्यांच्या इतिहासात सदैव कोरले गेले. त्यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनात १९४७ च्या स्वातंत्र्य युद्धापासून ते कारगिल युद्धापर्यंतच्या शौर्यगाथेचे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शित करण्यात आले होते. यामध्ये देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. प्रदर्शनाचे उद्घाटन दस्तूर स्कूल्स ट्रस्टचे अध्यक्ष बेहराम पदमजी यांच्या हस्ते झाले.