मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी जोर
पांडुरंग सरोदे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २२ ः महापालिका प्रशासनाकडून मिळकतकर भरण्यासंदर्भात वारंवार सूचना देऊनही एकूण मिळकतकरधारकांपैकी सुमारे साडेसात लाखइतक्या मालमत्ताधारकांकडून मिळकतकर भरण्याकडे पाठ फिरवली जात आहे. त्यामध्ये शासकीय संस्थांसारख्या थकबाकी न मिळणाऱ्यांची संख्या अधिक आहे. असे असले तरीही हजारो कोटी रुपये मिळकतकराच्या थकबाकीचा महसूल तिजोरीत येण्यासाठी महापालिकेने आता कंबर कसली आहे. त्यासाठी मालमत्ता जप्ती, नळजोड तोडणे, लिलावासारख्या कारवाईवर भर देण्यासह अधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यांना थकबाकी गोळा करण्यासाठीचे लक्ष्य देण्यावर आता भर देण्यात आला आहे.
महापालिकेच्या करआकारणी व मिळकतकर विभागाकडून शहरातील मिळकतींचा कर वसूल करण्याचे काम केले जाते. बहुतांश मिळकतधारकांकडून महापालिकेकडे नियमितपणे मिळकतकराचा भरणा केला जातो. मात्र काही मालमत्ताधारक, संस्था, आस्थापनांकडून मिळकतकर भरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. या स्वरूपाची उदासीनता व शास्तीकराच्या धास्तीमुळे थकबाकीची रक्कम हजारो कोटींच्या घरात वाढत जात असल्याची सद्यःस्थिती आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. महापालिकेकडून २०२४-२५ या वर्षामध्ये मिळकतकर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ३४४ मिळकतींवर जप्तीची कारवाई करून त्यांना टाळे ठोकण्यात आले आहे, तर सूचना मिळून वारंवार संधी देऊनही मिळकतकर भरण्याबाबत टाळाटाळ करणाऱ्या २५ मिळकतींवर नळजोड तोडण्याची गंभीर कारवाईदेखील महापालिकेने केली आहे. याबरोबरच ७८ मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
थकबाकीचा डोंगर वाढता वाढे
मोबाईल टॉवर, समाविष्ट गावे, शासकीय संस्था, न्यायप्रविष्ट प्रकरणे, अनधिकृत मिळकती अशा वेगवेगळ्या घटकांकडून तब्बल हजारो रुपयांची थकबाकी महापालिकेस मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र ही थकबाकी महापालिकेस मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यामुळे मिळकत कराच्या थकबाकीचा डोंगर १७ हजार कोटी रुपयांहून पुढे जात असल्याची सद्यःस्थिती आहे. ही थकबाकी महापालिकेच्या तिजोरीत येण्यासाठी महापालिकेच्या करआकारणी व मिळकतकर विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने संबंधित विभागाकडून विभागीय निरीक्षक, पेठ निरीक्षकांना थकबाकी गोळा करण्यासाठी लक्ष्य देण्यात आले आहे. विशेषतः शहरात मालमत्ता आहेत, मात्र त्यांची नोंद नाही, अशा मालमत्तांचा शोध घेणे, मालमत्तेचा वापर वेगळ्या कारणासाठी होत असल्यास तसेच मालमत्तेमध्ये काही बदल केले असल्यास त्यांची नोंदणी करून त्यांना कर आकारणी करण्यासारख्या विविध प्रकारच्या उपाययोजना महापालिकेकडून राबविल्या जात आहेत.
...म्हणून लिलाव प्रक्रियेला होतो विलंब
मिळकतकराची थकबाकी असणाऱ्यांवर महापालिकेकडून जप्ती, नळजोड तोडण्यासह लिलावाचीही कारवाई केली जाते. संबंधित मिळकत महापालिकेच्या नावावर करून तहसीलदाराकडून बोजा चढविणे, मूल्यांकन करणे, लिलावासाठीची मान्यता घेणे अशी तांत्रिक टप्पे पार केल्यानंतर लिलावाची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतरही संबंधित मिळकतींच्या लिलावास कमी प्रतिसाद मिळतो. परिणामी लिलावाच्या प्रक्रियेस विलंब होत असल्याची सद्यःस्थिती आहे.
कुणाकडे किती थकबाकी
- मोबाईल टॉवर - ४ हजार २०० कोटी
- समाविष्ट गावे - २ हजार कोटी
- न्यायप्रविष्ट प्रकरणे - १३०० कोटी
- अनधिकृत मिळकती - १००० कोटी
- शासकीय मिळकती - १२५ कोटी
- दुबार/वादविवादातील मिळकती - ६००० कोटी
दृष्टिक्षेपात
- शहरातील एकूण मिळकतकरधारक - चौदा लाख ८० हजार
- थकबाकी असणाऱ्या मिळकती - ७ लाख ४६ हजार ५२० समाविष्ट गावातील मिळकती - साडेचार लाख)
- मिळकतींची थकबाकी रक्कम - १७ हजार कोटी
- जप्तीची कारवाई केलेल्या मिळकती - ३४४
- लिलाव प्रक्रिया सुरू असलेल्या मिळकती - ७८
- नळजोड तोडण्याची कारवाई झालेल्या मिळकती - २५
महत्त्वाचे
२०२५-२६ मधील जमा झालेला मिळकतकर - १५५६ कोटी (मे ते जुलै)
मिळकतकर भरणाऱ्यांची संख्या - ८ लाख ३९ हजार
थकबाकी असणाऱ्या मिळकतींवर जप्ती, लिलावाची कारवाई करण्यासह विभागीय निरीक्षक, पेठ निरीक्षकांना थकबाकी जमा करण्यासाठीचे लक्ष्य दिले आहे. त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. याबरोबरच मिळकतकराचा महसूल वाढविण्यासाठी वेगवेगळ्या उपयोजनाही केल्या जात आहेत. त्याचबरोबर अधिकाधिक थकबाकी महापालिकेस मिळावी, यादृष्टीने कारवाई केली जाते. नागरिकांनी मिळकतकर नियमितपणे भरावा, त्यामुळे शास्तीकर भरण्याची वेळ येणार नाही.
- अविनाश सपकाळ, प्रमुख, करआकारणी व मिळकतकर विभाग, महापालिका
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.