नवउद्योजकांना आज मिळणार तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन
पुणे, ता. १३ : ‘ब्रह्मोद्योग स्टार्टअप कॉन्क्लेव्ह-२०२५’ ही कार्यशाळा रविवारी (ता. १४) भोसरी फाटा येथील हॉटेल कलासागर येथे होणार आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पिंपरी-चिंचवड उद्योजकता विकास आघाडी आणि ब्रह्मोद्योग फाउंडेशन यांच्यातर्फे याचे आयोजन केले आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांच्या हस्ते होणार असून, या वेळी ‘पीतांबरी’चे रवींद्र प्रभू देसाई, रिझर्व्ह बँकेचे माजी संचालक सतीश मराठे, महाराष्ट्र शासनाच्या स्टार्टअप कमिटीचे सदस्य प्रसन्न देशपांडे आणि बुलडाणा बँकेचे शिरीष देशपांडे हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात सरकारी कर्जे व सबसिडी योजना, व्यवसायाचे आर्थिक व्यवस्थापन, युनिट इकॉनॉमिक्स, मूल्यवर्धन, निर्यात संधी, मार्केटिंग व ब्रँडिंग धोरणे या विषयांवर तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करतील, तसेच उद्योजकांना नेटवर्किंग व बिझनेस डेव्हलपमेंटची संधी मिळणार आहे.
उद्योजक, व्यावसायिक, स्टार्टअप्स, कन्सल्टंट्स, ट्रेनर्स तसेच व्यवस्थापन व अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थी यांच्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यशाळेस यावे असे आवाहन आयोजकांनी केले.