मराठी रंगभूमीवर नव्या नाटकांची नांदी

मराठी रंगभूमीवर नव्या नाटकांची नांदी
Published on

पुणे, ता. ३० : आशयघन आणि दर्जेदार नाट्यनिर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी रंगभूमीवर नव्या नाटकांची नांदी होत आहे. वेगळ्या धाटणीची अन् वैविध्यपूर्ण विषयांवरील नाटकांच्या प्रयोगांना लवकरच सुरुवात होत आहे. या नाटकांमधून सचिन खेडेकर, महेश मांजरेकर यांसारखे कलाकार पुन्हा एकदा मराठी नाटकांमध्ये पुनरागमन करत असल्याने या नाटकांची उत्सुकता वाढली आहे.
क्षितिज पटवर्धन लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ या नाटकाच्या प्रयोगांना २८ मार्चपासून प्रारंभ झाला. जिगीषा आणि अष्टविनायक संस्थेची निर्मिती असलेल्या या नाटकात ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर हे मध्यवर्ती भूमिका साकारणार आहेत. या नाटकाच्या निमित्ताने खेडेकर हे तब्बल २१ वर्षांनी पुन्हा एकदा व्यावसायिक रंगभूमीवर काम करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या नव्या भूमिकेविषयी रसिकांना उत्सुकता आहे.
खेडेकर यांच्याप्रमाणेच ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर हेदेखील प्रदीर्घ काळाने रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन त्यांनीच केले असून सहा एप्रिलपासून या नाटकाच्या प्रयोगांना सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने अभिनेत्री ऊर्मिला कानिटकर या पहिल्यांदाच रंगभूमीवर काम करणार आहेत. त्यांच्यासह उदयोन्मुख अभिनेता विराजस कुलकर्णी हादेखील दिसणार असून सस्पेन्स थ्रिलर प्रकारातील हे नाटक आहे.
‘किर्रकिर्र करणाऱ्या नात्यांची कौटुंबिक कॉमेडी’, असे आगळेवेगळे उपशिर्षक असलेले ‘कुटुंब किर्रतन’ या नव्याकोऱ्या नाटकाच्या प्रयोगांनाही नुकतीच सुरुवात झाली आहे. गौरी थिएटर्स निर्मित, प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित हे नाटक संकर्षण कऱ्हाडे यांनी लिहिले असून त्यांनी यात अभिनयही केला आहे. त्यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते आणि युवा अभिनेत्री तन्वी मुंडले यांच्याही भूमिका या नाटकात आहेत.

वपुंच्या साहित्याची पर्वणी
दिवंगत लेखक व. पु. काळे यांच्या साहित्यावर आधारित ‘११ वपुर्झा’ हा आगळावेगळा कार्यक्रमही रंगभूमीवर सादर होत आहे. व. पु. काळे यांच्या कन्या स्वाती काळे-चांदोरकर यांनी याचे लेखन व दिग्दर्शन केले असून त्यांच्यासह सुनील बर्वे आणि शशांक केतकर हे दोन कसलेले अभिनेते हा कार्यक्रम सादर करतात. मराठी साहित्यावर विशेषतः वपुंच्या लिखाणावर प्रेम करणाऱ्या रसिकांसाठी ही पर्वणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com